नवी मुंबई : खोपटे (उरण) येथे बस अपघातात एनएमएमटीच्या बसचालकाला मारहाण करून घटनास्थळी आलेल्या अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या निषेधार्थ श्रमिक सेनेने आज काही काळ काम बंद आंदोलन केले. त्यामुळे एक तास बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे काही प्रमाणात हाल झाले.
जुईनगरवरून खोपटे कोपरोली मार्गावर जाणाऱ्या ३४ क्रमांकाच्या बसवरील चालकाचा खोपटे येथे ताबा सुटल्याने रस्त्यातील तीन दुचाकीस्वार आणि एक टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये खोपटा येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या खोपटे येथील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून चालकाला मारहाण करत घटनास्थळी दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना तब्बल सात ते आठ तास ओलीस धरले होते.