नवी मुंबईत आठ बांगलादेशींवर कारवाई; पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश

नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल
नवी मुंबईत आठ बांगलादेशींवर कारवाई; पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर राहणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पाच महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. पायल कुटुस मलिक, रूबी काशम अली बेगम, कनिका बाबू शेख, राणी शब्बीर मुल्ला, हलीमा सलीम शेख, मोनिरूल सिध्दीकी शेख, सलीम कुका शेख, मासुद राजु राना असे यातील आरोपींची नावे असून सर्वच बांगलादेशचे नागरिक आहेत.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना शहबाज गावातील सागर रेसिडेन्सी इमारतीतील ४०३ क्रमांकाच्या सदनिकेत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर राहतात अशी माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अगोदर सदर माहितीची शहानिशा करण्यात आली. माहितीत तथ्य आढळून आल्याने या ठिकाणी छापा टाकला असता. तीन पुरुष आणि सहा महिला आढळून आल्या.

त्याच्याकडे भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागदपत्रे आढळून आले नाहीत त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. पाच महिला आणि तीन पुरुषांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी सुमारे पाच वर्षांपासून नवी मुंबईत राहत होते.

या व्यतिरिक्त अजून एक बांगलादेशी नासरीन सिध्दीकी अक्तर, नावाची महिला याच समूहासोबत आढळून आली होती. मात्र तिच्याकडे पारपत्र आणि वैद्यकीय उपचारार्थ देण्यात आलेला वैध व्हिसा आढळून आला. त्यामुळे तिला सोडून देण्यात आले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in