वडाळा येथे लवकरच ४,००० घरांचे सीजीएसटी संकुल

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ७७० सदनिका आणि कार्यालयांसाठी एक टॉवर बांधण्यात येणार आहे
वडाळा येथे लवकरच ४,००० घरांचे सीजीएसटी संकुल

वडाळा येथे लवकरच ४० एकर क्षेत्रावर ४००० निवासस्थाने आणि कार्यालयीन वापराच्या तीन इमारती यांचा समावेश असलेला सीबीआयसीचा आगामी निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे केंद्रीय महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ७७० सदनिका आणि कार्यालयांसाठी एक टॉवर बांधण्यात येणार आहे. यानंतर पुढील टप्प्यात दोन कार्यालयीन टॉवरसह सुमारे ४००० निवासी सदनिका बांधण्यात येणार असल्याची माहिती महसूल सचिवांनी दिली.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सीबीआयसी अर्थात केंद्रीय अप्रत्यक्ष कर तसेच सीमाशुल्क मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई प्रदेश केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागात कार्यरत अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्गासाठी नवी मुंबईत खारघर येथे उभारण्यात आलेल्या ‘केंद्रीय जीएसटी परिसर’ या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन केले. या वेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी या प्रकल्पात राहायला येणाऱ्या सीबीआयसीच्या विविध श्रेणीतील पहिल्या पाच घरांचे मालक असलेल्या अधिकाऱ्यांना समारंभपूर्वक घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या. तरुण बजाज यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सीजीएसटीविषयी थोडक्यात...

केंद्रीय जीएसटी परिसर हा विचारपूर्वक आराखड्यासह उभारण्यात आलेला आणि नवी मुंबई परिसरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेला एक विस्तीर्ण निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पाजवळून मुंबई तसेच पुणे या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारे रस्ते जातात तसेच येथून रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या सुविधा सुलभतेने उपलब्ध आहेत. हा प्रकल्प करारात निर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत आणि १४ महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला आहे. या प्रकल्पातील इमारती आधुनिक संरचनेच्या, पर्यावरणस्नेही तसेच शाश्वत बांधणीच्या असून त्या जीआरआयएचए तीनमधील सर्व विहित मानकांची पूर्तता करणाऱ्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in