नवी मुंबई : चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी सोमवारी रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केल्याची घटना घडली आहे. रबाळे पोलिसांनी या लुटारूंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, चेन स्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी ऐरोली भागात मागील आठवड्याभरात केलेली ही तिसरी चेन स्नॅचिंगची घटना आहे. गत आठवड्यात या लुटारूंनी दोन महिला शिक्षकांच्या अंगावरील दागिने लुटून नेले होते.
या प्रकरणातील तक्रारदार सिंधु मोरे (५४) या ऐरोली सेक्टर-५ मध्ये कुटुंबासह राहण्यास आहेत. सिंधु मोरे या आपल्या चाळीतील महिलांसोबत दररोज रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी जात असतात. सोमवारी रात्री ११ वाजता सिंधु मोरे या चाळीतील महिलांसोबत ऐरोली सेक्टर-५ मधील पंचवटी अपार्टमेंटच्या समोरील रोडवर शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारूने सिंधु मोरे यांच्या पाठीवर जोरात थाप मारून त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून भरधाव वेगात पलायन केले. या प्रकारानंतर सर्व महिलांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत दोघे लुटारू दिसेनासे झाले. त्यानंतर या सर्व महिलांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.