नवी मुंबईत चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंचा हैदोस

नवी मुंबईत चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंचा हैदोस

विशेष म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना हे लुटारु लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे.
Published on

चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंनी मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत हैदोस घातला असून हे लुटारू मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना लक्ष करत असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे या लुटारूंचा अटकावर करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातंर्गत सकाळी ५ ते ८ या कालावधीत नाकाबंदी लावून संशयास्पद वाहनांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे स्वत: जातीने हजर राहून गुन्हेगारांवर वॉच ठेवत आहेत. चेनस्नॅचिंग करणाऱया लुटारूंनी मागील काही दिवसांपासून नवीमुंबईत पुन्हा आपल्या कारवाया वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना हे लुटारु लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. सोमवारी सकाळी या लुटारूंनी वाशी, कोपरखैरणे आणि सानपाडा या भागात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन व्याक्तिंच्या अंगावरील लाखो रुपये किंमतीचे दागिने लुटल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही चेनस्नॅचिंगच्या गुह्यातील आरोपी एकच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गत २० ऑगस्ट रोजी या लुटारूंनी कामोठे सेक्टर-३६ मध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या धर्मेंद्रकुमार वर्मा यांच्या गळ्यातील तब्बल १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे दागिने लुटून नेले आहेत.

त्याचप्रमाणे १३ ऑगस्ट रोजी या लुटारूंनी पत्नीसह पामबीच मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या मदनमोहन नायक या जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील १ लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचुन नेल्याचे उघडकीस आले आहे. हे लुटारू मॉर्निंग वॉकसाठी सकाळच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना लक्ष करुन त्यांचे दागिने लुटून नेत असल्याचे या सर्व घटनांवरुन दिसून येत आहे. या लुटारूंच्या वाढत्या कारवायांमुळे नवी मुंबई पोलिसांची झोप उडाली आहे. चेनस्नॅचिंग करणाऱ्या लुटारूंच्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी तसेच त्यांना अटकाव करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यातंर्गत नाकाबंदी करण्याच्या व संशयीत वाहनांची तपासणी करण्याच्या सक्त सुचना पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह व सह पोलीस आयुक्त डॉ.जय जाधव यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in