
नवी मुंबई : अल्पवधीत जुन्नर हापूस संपला असला तर आंबा खवय्यांसाठी चेन्नई हापूस आणि कच्छ केसर आंबा मोठ्या प्रमाणात एपीएमसी बाजारात दाखल होत आहे. विशेष म्हणजे हवेत गारवा असला तरी हे आंबे हातोहात विकले जात असून अजून किमान १५ दिवस हा सिझन राहणार आहे.
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हैदोस घातल्याने यंदा जुन्नर हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात यंदा पावसाळा ७ जूनऐवजी मे च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्याने पुणे भागातील जुन्नर हापूस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हापूसला त्याचा फटका बसला आहे.
किमान वीस ते पंचेवीस दिवस जुन्नर हापूसची आवक जोरदार होते. त्यात पावसाळ्यापूर्वीचा उकडा असल्याने या आंब्याला प्रचंड मागणी असते. यंदा मात्र पावसामुळे व्यापारी, शेतकरी आणि मालवाहतूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
दोन्ही आंब्यांना चांगली मागणी
यंदा राज्यातील आंबा लवकर संपला असला तरी आंबा खवय्यांसाठी आता बाजारात चेन्नई हापूस आणि गुजरात कच्छ येथील केसर आंबा दाखल होत आहे. रत्नागिरी, देवगड किंवा जुन्नर हापूसच्या तुलनेत चेन्नईच्या हापूसचा दर्जा कमी असतो. त्याचा दरही राज्यातील हापूसपेक्षा कमी आहे. दुसरीकडे हापूस आंब्याला पर्याय म्हणून ज्या केसर आंब्याला समजले जाते. त्या आंब्याची आवक वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या दोन्ही आंब्यांना चांगली मागणी येत आहे.
किरकोळ बाजारात किमत अधिक
चेन्नई हापूस हा घाऊक बाजारात १२० ते १४० रुपये डझन असून किरकोळ बाजारात अंदाजे २०० ते २५० रुपयापर्यंत विकला जात आहे, तर केसर आंबा ६० रुपये ते १२० रुपये किलो असून किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपये किलोने विकला जात आहे.
जास्त गर असणारा हा आंबा
सर्वात स्वस्त तोतापुरी आंब्याची आंध्र प्रदेश कर्नाटक भागातून आवक होते. घाऊक बाजारात २० ते २५ तर किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. हा आंबा गोड असला तर हापूस किंवा केसरप्रमाणे पूर्ण गोड नसून थोडा आंबट लागतो.
पाडाचा आंब्याच्या चवीशी साधार्मी असणारे फळ आहे. ज्यूस प्रकारात याचा जास्त उपयोग होतो, जास्त गर असणारा हा आंबा आहे.
पावसाने लवकर सुरुवात केल्याने जुन्नर हापूस सिझन लवकर संपला, मात्र चेन्नई हापूस आणि कच्छ केसर आंब्याची आवक सुरू झाली आहे. दोन्हीच्या अंदाजे दीड ते दोन हजार पेटींची रोज आवक होत आहे. आठ दिवसांपर्यंत आवक वाढणार असून त्यानंतर मात्र कमी होत जाईल.
- संजय पानसरे (संचालक फळ मार्केट)