नवी मुंबईतही चिटफंड घोटाळा; ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटींची फसवणूक व्याप्ती वाढण्याची शक्यता, गुन्हा दाखल

पार्टे हा लक्ष्मी प्रसाद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालक ही आहे. या दोन्हीच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली.
 नवी मुंबईतही चिटफंड घोटाळा; ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटींची फसवणूक व्याप्ती वाढण्याची शक्यता, गुन्हा दाखल

नवी मुंबई : शेती उत्पदनात गुंतवणूक करा महिना ५ टक्के नफा आणि ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत मिळवा अशी आकर्षक जाहिरात करीत एका कंपनीने एजंटद्वारे ३०० लोकांची २६ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जाची छाननी करीत संबंधित आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एपीएमसी पोलीस तपास करीत आहेत.

नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव सचिन भिसे असे यातील आरोपींची नावे असून यापैकी मुख्य आरोपी पार्टे व अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे तर एकाचा शोध सुरू आहे. नितीन पार्टे संचालक असलेली रुद्रा ट्रेडर्स नावाची एक फर्म आहे. वाशीतील सर्वात आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळख असलेल्या सतरा प्लाझा या ठिकाणी त्याचे कार्यालय आहे. मसाला आणि सुकामेवा याचबरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम ही फर्म करते, असे सर्वत्र भासवले जात होते. याशिवाय पार्टे हा लक्ष्मी प्रसाद को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालक ही आहे. या दोन्हीच्या जीवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली. आम्ही थेट शेतात बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करतो त्यामुळे नफा फार मोठा मिळतो. तुम्हीही गुंतवणूक करा, जेवढी गुंतवणूक कराल त्याच्या पाच टक्क्याने दर महिन्याला परतावा मिळणार तसेच गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांनी परत मिळणार, असे आमिष दाखवून पैसे घेतले जात होते.

हा व्यवहार पारदर्शक आहे हे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे धनादेश, फिक्स डिपॉजिट बॉण्ड गुंतवणूकदारांना दिले जात होते. हा सर्व प्रकार मार्च २०२२ पासून सुरू होता. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवाउडवीचे उत्तरे देतात. त्यात मुख्य आरोपी पार्टे हा बहुतांश वेळेस देशाबाहेर असतात. त्यामुळे अखेर याबाबत काही दिवसापूर्वी महेंद्र डेरे या गुंतवणूक दराने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पथक नेमले. याप्रकरणी गुरुवारी रात्री आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in