तुर्भेतील अतिक्रमणावर सिडकोची कारवाई

सदरची बाब येथील काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच आरटीआय कार्यकर्ते तसेच येथील काही ग्रामस्थांनी सदरची बाब सिडकोच्या निदर्शनास आणून दिली होती
तुर्भेतील अतिक्रमणावर सिडकोची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर २२, येथील सिडकोच्या मालकीचे भूखंड क्रमांक २९६ ए, २९६ बी, २९६ सी, २९६ डी हे चार भूखंड सिडको प्रशासनाने २०१७ साली तारेचे कुंपण घालून संरक्षित केले होते. तसेच सदर भूखंडांवर बांधकाम करण्यावर एमआरटीपी ॲक्टनुसार कारवाई केली जाईल, असे निर्देश देणारा फलकही येथे लावण्यात आला होता. मात्र हा फलक व कुंपण तोडून विकासकाने सदर भूखंडावर बांधकाम सुरू केले होते. गेली तीन महिन्यांपूर्वी तुर्भेतील काही भूमाफियांनी एका बिल्डरला हाताशी धरून सदरचे चारही भूखंड फिफ्टी-फिफ्टी तत्त्वावर विकसित करण्यास दिले होते. या पोटी भूमाफियांनी विकासकाकडून या चार भूखंडाची मोठी रक्कम ‘ऑन मनी’ म्हणून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सदरची बाब येथील काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच आरटीआय कार्यकर्ते तसेच येथील काही ग्रामस्थांनी सदरची बाब सिडकोच्या निदर्शनास आणून दिली होती व सिडकोला सदर बांधकामावर कारवाई करण्यासाठी अनेक वेळा पत्र व्यवहारही केला. मात्र सिडको प्रशासनाने उशिरा का होईना, सदर बांधकामांवर तोडक कारवाई केल्याने येथील भूमाफियांबरोबरच विकासकास चांगलीच जरब बसली आहे.

सदर अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यापूर्वी लक्ष्मी तुळशीराम पाटील, निरा दत्तू पाटील, श्रीकांत दत्तू पाटील यांना सिडकोकडून रीतसर नोटीसाही बजावण्यात आल्याचे सिडको प्रशासनाकडून सांगण्यात आले, दरम्यान सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागाचे मुख्य नियंत्रक संजय जाधव आणि सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे विभागाचे नियंत्रण वेणू नायर यांनी पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करून अतिक्रमण हटविल्यानंतर सदर ठिकाणी लगेचच तारेचे कंपाऊंड वॉल घालून सिडकोने या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्यास एमआरटीपी ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा प्रथमदर्शनी बोर्ड लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in