Navi Mumbai : लाचप्रकरणी सिडकोचा अप्पर जिल्हाधिकारी अटकेत; ACB ने रंगेहात पकडले

सिडकोच्या साडेबारा टक्के योजना विभागातील नोंदणीचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रंगेहात पकडले.
Navi Mumbai : लाचप्रकरणी सिडकोचा अप्पर जिल्हाधिकारी अटकेत; ACB ने रंगेहात पकडले
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी मुंबई : सिडकोच्या साडेबारा टक्के योजना विभागातील नोंदणीचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी रंगेहात पकडले. जगताप यांनी लाचेची रक्कम शिपायामार्फत स्वीकारल्याने एसीबीच्या पथकाने संबंधित शिपायालाही अटक केली आहे.

रामदास जगताप (५७) हे सिडकोच्या साडेबारा टक्के योजना विभागात मुख्य भूमी आणि भूमापन अधिकारी म्हणून कार्यरत होते. एका व्यक्तीचे नोंदणीचे प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी त्यांनी संबंधितांकडे २२ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.

या प्रकरणाची तक्रार संबंधित व्यक्तीने नवी मुंबई येथील एसीबीकडे केल्यानंतर, पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने सिडको मुख्यालयात सापळा रचला. जगताप यांच्या सूचनेनुसार त्यांचा शिपाई हरेश सोनावणे याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांवर झडप घालत त्यांना ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे सिडकोमधील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एसीबीच्या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. निवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनातही चर्चांना उधाण आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in