सिडकोत बोगस कामगार घोटाळा; २८ जणांचे पगार सिडकोच्या तिजोरीतून

सिडकोमध्ये प्रत्यक्ष कामगार नसताना त्यांच्या नावावर बँकेत वेतन जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला
सिडकोत बोगस कामगार घोटाळा; २८ जणांचे पगार सिडकोच्या तिजोरीतून

सिडकोमध्ये प्रत्यक्ष कामगार नसताना त्यांच्या नावावर बँकेत वेतन जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी एका अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे. काम न करता वेतन घेणाऱ्या एका कामगाराला आयकर विभागाची नोटीस आल्याने हे प्रकरण उघडकीस आले. प्राथमिक चौकशीत असे २८ बोगस कामगार असून त्यांना सहा वर्षांपासून वेतन अदा केले जात होते. अशा पद्धतीने सुमारे तीन कोटी रुपयांचा गंडा सिडकोला घातला गेला आहे. याची व्याप्ती वाढू शकत असल्याने सिडको व्यवस्थापकीय संचालकांनी गत दहा वर्षांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये सिडकोतील सागर तापडीया या अधिकाऱ्याची चौकशी सिडको दक्षता विभागाचे प्रमुख सुरेश मेंगडे करीत आहेत. २०१७ पासून सिडकोमध्ये २७ जण वेगवेगळ्या विभागात काम करत असल्याचे दाखवून त्यांच्या नावावर पगार काढण्यात आला आहे. महिन्याला ५० ते ६० हजार रुपये पगार घेण्यात आल्याने जवळपास तीन कोटी रुपयांचा चुना सिडकोला लागला आहे. बोगस कामगारांच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले असून त्यांच्या खात्यात सिडकोची रक्कम वळती करण्यात येत होती.

दरम्यान, बोगस कामगारांच्या नावामधील चेतन बावत याला इन्कम टॅक्सची नोटीस आल्यावर त्याला सिडकोचा पगार मिळत असल्याचे लक्षात आल्याने हा घोटाळा समोर आला. याप्रकरणी चेतन याने माझ्या नावाने आयकर विभागाची नोटीस आली असून माझ्या खात्यावर सिडको पैसे जमा करत असल्याची तक्रार काही वर्षांपूर्वी केली होती. याच प्रकरणाच्या चौकशीतून हे रॅकेट उघडकीस आले आहे. या तक्रारीचा विचार करता अनेकांच्या नावे रक्कम जमा होत होती, मात्र त्याची कल्पना त्यांनाही नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘‘कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांमध्ये काही लोक बोगस पद्धतीने सिडको मध्ये दाखवण्यात आले आहेत व त्यांना २०१७ पासून वेतनही अदा केले जात आहे, ही सरकारची फसवणूक आहे. आमच्या कार्मिक विभागातील एका कर्मचारी यात सामील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पुढे असे काही होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असून गेल्या दहा वर्षांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.’’

- संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

‘‘या पूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली असून यात प्रामाणिक कर्मचाऱ्यांची फरफट होऊ नये, अशी ही मागणी आम्ही केली आहे. घडलेले प्रकरण अत्यंत गंभीर असून दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.’’

- विनोद पाटील, अध्यक्ष, सिडको एम्प्लॅाईज युनियन

‘‘सिडकोमध्ये कार्यरत असलेले सिडको सहाय्यक कार्मिक अधिकारी सागर तापडीया यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याने २८ कंत्राटी कामगाराची नेमणूक केल्याची खोटी कागदपत्रे सिडकोच्या लेखा विभागाकडे सादर केली. हे कामगार बोगस असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे. सागर याने २०१७ ते आजपर्यंत २ कोटी ८१ लाख ९३ हजार ४३४ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.’’

- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

logo
marathi.freepressjournal.in