सिडको घरांच्या चढ्या दरांची ‘परिगणना’ होणार; उपमुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय
नवी मुंबई : नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या उच्च दरांबाबत वाढत चाललेला नागरिकांचा असंतोष अखेर शासनपातळीवर ऐकण्यात आला आहे. परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली जाहीर झालेल्या चढ्या किमतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन्ही बाजूंची मते ऐकून घरांच्या दरांची पुनर्परिगणना (re-calculation) करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदारांनी सिडकोकडून अवाजवी दर आकारणी झाल्याचे पुरावे सादर केले. वाढलेल्या घर किमतीमुळे सर्वसामान्यांना भेडसावत असलेल्या अडचणींचा त्यांनी सविस्तर उहापोह केला. सिडको अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेखाली 'ना-नफा ना-तोटा' तत्त्वावर बांधकाम करत असल्याचा दावा करत, प्रकल्पातील सोयीसुविधा, बांधकाम खर्च, तांत्रिक व प्रशासकीय बाबी, प्रकल्प व्यवस्थापन खर्च याबाबत तपशीलवार माहिती दिली.
खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या तुलनेत सिडकोची घरे कमी दरात असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला.
सिडको मंडळाने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या दरांबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा घरांच्या दरांची परिगणना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच सुधारित परिगणना करून अहवाल सादर केला जाईल. -
विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद
नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या दालनातील बैठकीत भाजप आमदार विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिंदेंकडून पुनर्परिगणनेचे स्पष्ट निर्देश
दोन्ही बाजूंची सविस्तर मांडणी ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घर किमतींची परिगणना तातडीने करून सुधारित दररचना सादर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन दरांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची शक्यता वाढली आहे. सर्वसामान्यांना भेडसावत असलेल्या अडचणींचा त्यांनी सविस्तर उहापोह केला.

