घरांच्या सोडतीसाठी सिडकोला अखेर मुहूर्त मिळाला, गोरगरीबांची सिडको घराची प्रतीक्षा संपणार

जानेवारी २०२२ च्या गृहनिर्माण योजनेंतर्गत द्रोणागिरी व तळोजातील ३३२२ सदनिकांची सोडत काढण्यास अखेर सिडकोला मुहूर्त लाभला आहे. येत्या १९जुलै रोजी सिडको घरांची सोडत निघणार आहे.
घरांच्या सोडतीसाठी सिडकोला अखेर मुहूर्त मिळाला, गोरगरीबांची सिडको घराची प्रतीक्षा संपणार
Published on

नवी मुंबई : जानेवारी २०२२ च्या गृहनिर्माण योजनेंतर्गत द्रोणागिरी व तळोजातील ३३२२ सदनिकांची सोडत काढण्यास अखेर सिडकोला मुहूर्त लाभला आहे. येत्या १९जुलै रोजी सिडको घरांची सोडत निघणार आहे. त्याबाबत या गृहनिर्माण योजनेत सहभागी झालेल्या नागरिकांना सिडकोने सोडतीबाबत ऑनलाईन माहिती दिली आहे.

दरम्यान, जानेवारी २०२२च्या योजनेंतर्गत द्रोणागिरी व तळोजा परिसरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ३२२ सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील ६१ व तळोजा नोड येथील २५१ याप्रमाणे ३१२ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर द्रोणागिरी येथील ३७४ व तळोजा येथील २६३६ मिळून ३०१० सदनिका या सर्वसाधारण घटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या महागृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत १९ एप्रिल २०२४ रोजी काढली जाणार असल्याचे सिडकोने फारपूर्वी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे घरांची सोडत काढणे सिडकोला शक्य झाले नाही. दरम्यान, लोकसभा निवडणूकीचा निकाल संपुष्टात येऊन महिना लोटला तरी जानेवारी २०२४ च्या योजनेंतर्गत विक्रीस काढलेल्या ३३२२ सदनिकांच्या संगणकीय सोडतीची घोषणा सिडको करत नसल्यामुळे घर घेणारे गोरगरीब ग्राहक हवालदिल झाले होते. अखेर येत्या १९ जुलै रोजी जानेवारी २०२४ च्या योजनेची संगणकीय सोडत सिडको काढणार असल्याची माहिती सिडकोच्या गृहनिर्माण विभागाचे पणन व्यवस्थापक श्रीनिवास मोकलीकर यांनी दिली.

ग्राहकांच्या अनामत रकमेवर बँका झाल्या गब्बर

सिडकोच्या या योजनेत अल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी दीड लाख रुपये, तर अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांनी ७५ हजार रुपये अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. सिडकोच्या या योजनेत घर घेण्यास इच्छुक असलेले सुमारे साडेचार हजारांहून गरीब नागरिक सहभागी झाले आहेत. जे नागरिक सोडतीत नशीबवान ठरणार नाहीत, त्यांच्या अनामत रकमेवर बँकेला मात्र सहा महिन्यांचे व्याज व पैसा वापरावयास मिळणार आहेत. तर दुसरीकडे कर्ज काढून अनामत रक्कम भरणाऱ्या गरीब नागरिकांना मात्र त्या रकमेवर विनाकारण व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळे सिडकोने लवकरात लवकर ही सोडत काढण्याची मागणी जोर धरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in