

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर कार्गो वाहतुकीत मोठी वाढ अपेक्षित असताना, शहराला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक्स हब बनवण्याच्या दिशेने सिडकोने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क उभारणीसाठी प्राथमिक टप्प्यात स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) मागवण्यात आली आहे.
सिडकोकडून राबविण्यात येणारा हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सशक्त दळणवळणाचा लाभ घेत शहराच्या आर्थिक विकासाला चालना देणार आहे. तसेच, अधिकृत लॉजिस्टिक्स हब उभारल्याने परिसरातील अनधिकृत गोदामांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.
पुष्पक नोडमधील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. सविस्तर आराखड्यानुसार संपूर्ण क्षेत्र सात लॉजिस्टिक्स झोनमध्ये विभागले जाणार असून ४५ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे.
प्राथमिक टप्प्यात सुमारे ७२ हेक्टर क्षेत्रातील १२ भूखंडांसाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे गुंतवणूकदारांना संधी देण्यात आली आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत सुविधा सिडकोकडून विकसित केल्या जाणार असून, निवड झालेल्या अर्जदारांशी सामंजस्य करार करून भूखंड वाटपाची प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्र लॉजिस्टिक्स धोरणानुसार या प्रकल्पात वेअरहाउसिंग, कंटेनर फ्रेट स्टेशन, इनलँड कंटेनर डेपो तसेच लघुउद्योगांसाठी सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे नवी मुंबईची ओळख आधुनिक आणि सक्षम आर्थिक केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे.
जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मजबूत प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या बळावर नवी मुंबई हे लॉजिस्टिक्स आणि संबंधित उद्योगांसाठी नैसर्गिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कमुळे कार्यक्षम मालवाहतूक, गुंतवणूक वाढ आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प नवी मुंबईला राष्ट्रीय लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.
विजय सिंघल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिडको