सिडको नैना प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

विकास कामांकरिता मागविण्यात आल्या निविदा; विकास कामांना लवकरच सुरुवात
सिडको नैना प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग प्राप्त होणार असून, टीपीएस-२, ३, ४, ५, ६ आणि ७ अंतर्गत प्रस्तावित असणाऱ्या रस्ते, पदपथ, पावसाळी पाण्याची गटारे इ. विकास कामांकरिता सिडकोतर्फे निविदा मागविण्यात आल्या असून, लवकरच या विकास कामांना प्रारंभ होणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतलच्या प्रदेशाची होणारी संभाव्य अनिर्बंध वाढ रोखण्यासाठी या प्रदेशातील ३७१ चौ.कि.मी. क्षेत्रामध्ये नैना हे सुनियोजित आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असे शहर विकसित करण्यात येत आहे. नैना प्रकल्पाच्या जलद आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी नैना विकास आराखड्याची अंमलबजावणी १२ नगररचना परियोजनांद्वारे (टीपीएस) करण्यात येत आहे. जमीन मालकांचा सहभाग या तत्त्वावर नगररचना परियोजना आधारित आहेत. योजनांमधील पायाभूत सुविधांचा विकास सिडकोतर्फे करण्यात येत आहे. अंतिम नगर रचना परियोजना क्र. १ व २ तसेच प्राथमिक नगररचना परियोजना क्र. 3 यांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. नगर रचना परियोजना क्र. ४, ५, ६ व ७ यांच्या प्रारुप परियोजनांना शासनाची मंजुरी मिळाली असून, या परियोजनांच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनातर्फे लवादाची नियुक्ती झाली आहे.

सिडकोतर्फे टीपीएस-२, ३, ४, ५ आणि ६ अंतर्गत टप्पा-१ पर्यंत रस्त्यांचा विकास, पदपथ आणि पावसाळी पाण्याची गटारे इ. तर टीपीएस-७ अंतर्गत टप्पा-१पर्यंत रस्त्याची सुधारणा, पदपथ आणि पावसाळी पाण्याची गटारे इ. विकास कामांकरिता नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून, त्यानंतर टीपीएस अंतर्गत प्रस्तावित असणारी विकास कामे वेगाने सुरू होणार आहेत.

"नैना प्रकल्प राज्याच्या नगर नियोजन क्षेत्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नगररचना परियोजनांद्वारे या प्रकल्पाचा विकास करण्यात येत असल्याने प्रत्येक योजनेची व योजनेंतर्गत विकास कामांची वेगाने अंमलबजावणी व्हावी याकरिता सिडको प्रयत्नशील आहे. टीपीएस-२, ३, ४, ५, ६ आणि ७ अंतर्गत विकास कामांकरिता निविदा मागविण्यात आल्या असून, या योजनांमध्ये समाविष्ट जमिनींवर विकास कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. तसेच नैना आणि नवीन पनवेल यांना जोडणाऱ्या देवद गावाजवळील पुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे."

- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

logo
marathi.freepressjournal.in