अर्थसंकल्पात नागरिकांच्या सुविधांवर भर द्यावा!

नवी मुंबई शहराचा दर्जा कायम राखण्यासाठी येत्या वर्षांमध्ये विकासाची व जनतेच्या सेवासुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी.
अर्थसंकल्पात नागरिकांच्या सुविधांवर भर द्यावा!
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात नागरी सुविधांसाठी महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध स्राेतांचा वापर, नागरी सुविधा आदींबाबत आमदार मंदा म्हात्रे आणि नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यात नुकतीच बैठक पार पडली. सदर अंदाजपत्रकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मंगळवारी सादर केले जाऊ शकते. नवी मुंबई महानगरपालिकेचे सन २०२३-२४ चे सुधारित अंदाजपत्रक व २४-२५ चे मूळ अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये अंदाजपत्रकास मंजुरी मिळणार असल्याने सदर अंदाजपत्रकात नागरिकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबई शहर हे अत्याधुनिक शहर असून यापूर्वी शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. नवी मुंबई शहराचा दर्जा कायम राखण्यासाठी येत्या वर्षांमध्ये विकासाची व जनतेच्या सेवासुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी. यामध्ये पुढील कामांचा समावेश करण्यात यावा. आरोग्य सेवा आरोग्य सेवांमध्ये नवी मुंबई क्षेत्रात नवी मुंबई गावठाण व झोपडपट्टी एरियामध्ये तसेच नागरी वस्तीमध्ये आवश्यकतेप्रमाणे नागरी आरोग्य केंद्र रुग्णालय सुरू करून लोकांना त्याचा लाभ देण्यात यावा. तसेच बेलापूर येथे सार्वजनिक रुग्णालय बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रकात तीनशे कोटींची तरतूद करण्यात यावी. हिवताप व डेंग्यूसारख्या रोगांचा नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात यावी.

शहरातील नागरिकांच्या सुविधांसाठी रुग्णालयामध्ये एमआरआय, सिटीस्कॅनची व्यवस्था करण्यात यावी तसेच डायलिसिस मशीनची संख्या वाढवून ती रुग्णांना उपलब्ध करून देण्यात यावी.

सिटी मोबिलिटी शहरांमध्ये विविध ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यकतेप्रमाणे रस्त्यांचे मध्ये सुधारणा करणे आवश्यक तेथे उड्डाणपूल बांधणे इत्यादीकरिता अंदाजपत्रकात २०० कोटीहून अधिक रक्कमेची तरतूद करण्यात यावी. तसेच घणसोली ते ऐरोली उड्डाणपुलाच्या रक्कम रुपये ५०० कोटींच्या निविदा मंजूर करून लवकरात लवकर कामास सुरुवात करण्यात यावी. वाशी येथील पामबीचवरून मुंबईकडे जाण्यासाठी पुलांकरिता अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी तसेच बेलापूर सीबीडी येथून मुंबई-गोवा हायवेकडे जाण्यासाठी उड्डाणपुलासाठी तरतूद करण्यात यावी. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात तरतूद करून टाटा पॉवर खोपोली ते भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथे पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी. पर्यावरणाच्या संतुलन राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्यानमध्ये वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात यावी. नवी मुंबईतील गोरगरीब, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटीची तरतूद करण्यात यावी. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अर्थसंकल्पात शंभर कोटींची तरतूद करण्यात यावी. शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी लवकरच पार्किंग प्लाझा सुरू करण्यात यावेत, यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येणार आहे.

पालिकेचे उत्पन्न वाढविणे आवश्यक

महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करावे. महानगरपालिकेची थकीत मालमत्ता कराची, पाणी बिलांची उपकराच्या वसुलीबाबत कालबद्ध धोरण ठरवून नागरिकांवर ज्यादा कराचा बोजा न टाकता मनपाचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न करावेत. जेणेकरून नागरिकांना योग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून देता येईल. महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पातून निर्माण होणारे प्रक्रियाकृत पाणी विक्री औद्योगिक उद्योगधंद्यांना करून त्याच्यातून उत्पन्न वाढवण्यात यावे. जाहिरात धोरणाची योग्य अंमलबजावणी करून उत्पन्नात वाढ करण्यात यावी.

आ. मंदा म्हात्रे यांची नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकरांकडे मागणी

मंगळवारी पालिकेच्या अर्थसंकल्पाची शक्यता

२४ तास पाणीपुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रावर भर

घणसोली ते ऐरोली उड्डाणपूल मंजुरीच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला जाणार आहे. त्यात अनेक गोष्टी आयुक्तांच्या निदर्शनास आणून सुचवण्यात आल्या आहेत. मुख्यत्वे आर्थिक स्रोत वाढवणे, उत्तम सुविधा देणे, पायाभूत सुविधा उभ्या करणे , गावठाण भागातील त्रुटी दूर करणे आदींचा उहापोह केला असून त्याचे मार्ग ही सुचवण्यात आले आहेत. याबाबत पार पडलेल्या बैठकीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

- मंदा म्हात्रे (आमदार बेलापूर)

logo
marathi.freepressjournal.in