तळोजा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

सुरक्षेच्या कारणास्तव दोघांची वेगवेगळ्या सर्कलमध्ये रवानगी केली. त्यानंतर या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
तळोजा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

नवी मुंबई : तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या दोन कैद्यांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्याची घटना गत गुरुवारी घडली. या हाणामारीत एका कैद्याच्या जबड्याला दुखापत झाली आहे. तर दुसऱ्याचा दात पडून तो जखमी झाला आहे. या दोन्ही कैद्यांनी आपसात मारामारी करून कारागृहाची शांतता भंग केल्याने तसेच एकमेकांना दुखापत केल्याने या दोन्ही कैद्यांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

तळोजा कारागृहात हाणामारीत जखमी झालेल्या कैद्यांमध्ये अजिंक्य अनंत शिंदे उर्फ अवी (३२) व किसन विजय भोसले (३०) या दोघांचा समावेश आहे. या दोन्ही कैद्यांना कारागृहातील बॅरेक नंबर ७ मध्ये ठेवण्यात आले होते. गत गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून या दोघांमध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर किसन भोसले याने अजिंक्य शिंदे याला पाण्याच्या प्लास्टिकच्या बकेटने तोंडावर मारले. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर किरकोळ जखम झाली. त्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली.

त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी या बॅरेकमध्ये धाव घेऊन दोघांचे भांडण सोडवले. त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी अजिंक्य व किसन या दोघांना एकमेकांपासून दूर बसवले; मात्र यानंतर देखील अजिंक्यने तुरुंग अधिकाऱ्यांच्या पाठीमागून पळत जाऊन किसनला मारहाण केली. या मारहाणीत किसनचा वरचा दात पडून तो जखमी झाला. त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी दोघांना पकडून तुरुंगातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दोघांची वेगवेगळ्या सर्कलमध्ये रवानगी केली. त्यानंतर या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in