वेगमर्यादेमुळे हार्बरची कासवगती; लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल

लोकलची वेगमर्यादा कमी केल्याने हार्बर मार्गावर गुरुवार सकाळपासून लोकलचे वेळापत्रक बिघडले.
वेगमर्यादेमुळे हार्बरची कासवगती; लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाजवळ दोनवेळा लोकल घसरल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्थानकाजवळ दुर्घटना झालेल्या ठिकाणी हार्बर मार्गावरील लोकलची वेगमर्यादा कमी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तांत्रिक कामे रात्री उशिरापर्यंत मार्गी लावण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून, ही कामे वेळेत पूर्ण न झाल्यास शुक्रवारीही (ता.३ मे) लोकल उशिराने धावत आहेत.

हार्बर मार्गावर सोमवारी, २९ एप्रिल रोजी पनवेल-सीएसएमटी लोकल सीएसएमटी स्थानकाजवळ घसरली होती. या घटनेनंतर २ मे रोजी ही एका चाचणी लोकलच्या डब्याची दोन चाके रुळावरून घसरली. यामुळे हार्बर आणि मुख्य मार्गावरील प्रवाशांचे हाल झाले. लागोपाठ दोन घटना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल घसरलेल्या ठिकाणी लोकलची वेगमर्यादा १० किलोमीटर प्रतितास ठेवण्याचा निर्णय घेतला. दरदिवशी ही वेगमर्यादा सुमारे ३० किलोमीटर प्रतितास असते.

दुरुस्ती, देखभालीची कामे सुरू

लोकलची वेगमर्यादा कमी केल्याने हार्बर मार्गावर गुरुवार सकाळपासून लोकलचे वेळापत्रक बिघडले. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. वेगमर्यादेमुळे वेळापत्रक बिघडल्याने प्रशासनाने काही गाड्या रद्द केल्या. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या वेगमर्यादेमुळे कॉटन ग्रीन ते सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकलच्या रांगा लागल्या होत्या. लोकल घसरलेल्या ठिकाणी रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीची कामे सुरू आहेत. ही कामे रात्रीपर्यंत पूर्ण करून सकाळी रेल्वे सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. प्रशासनाने हाती घेतलेली कामे वेळेत पूर्ण झाल्यास शुक्रवारी सकाळी हार्बरवरील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

दुर्घटनेमुळे रेल्वेचा वेग कमी

सीएसएमटी स्थानकाजवळ दुर्घटना झालेल्या ठिकाणी हार्बर रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. प्रशासनाने हाती घेतलेली कामे रात्री पूर्ण करण्यात येणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in