महावितरणच्या ज्येष्ठता यादीत घोळ: कनिष्ठ व्यक्तीला दाखविले वरिष्ठ! इंटकचा आरोप

चूक प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही ही यादी दुरुस्त करण्याची मानसिकता महावितरण प्रशासनाची दिसत नाही.
महावितरणच्या ज्येष्ठता यादीत घोळ: कनिष्ठ व्यक्तीला दाखविले वरिष्ठ! इंटकचा आरोप

कल्याण : महावितरण कंपनीत महाव्यवस्थापक लेखा, पदावर काम करणाऱ्या एका भ्रष्ट अधिकाऱ्याला उच्चस्थानी मुख्य महाव्यवस्थापक, लेखा या पदावर बसविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली असून, बढतीसाठी वापरली जाणाऱ्या जेष्ठता यादीत या भ्रष्ट अधिकाऱ्याला हक्कदारांपेक्षा वरच्या स्थानी दाखविण्यात आले असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटकने केला आहे.

ही चूक प्रशासनाच्या लक्षात आणून देऊनही ही यादी दुरुस्त करण्याची मानसिकता महावितरण प्रशासनाची दिसत नाही. यामुळे आपल्या मर्जीतील व्यक्तीला उच्चस्थानी बसविण्यासाठी महावितरण मधील एक वरिष्ठ टीम कामाला लागली आहे. त्याचा एक भाग म्हणून या भ्रष्ट व्यक्तीपेक्षा वरिष्ठ असणाऱ्या अन्य अधिकाऱ्याला ज्येष्ठता यादीत खालच्या क्रमांकावर दाखविले गेले आहे व या बदनाम अधिकाऱ्याला वरिष्ठ स्थानी दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ व्यक्तीला डावलता यावे व या बदनाम व्यक्तीची अंतर्गत लेखा विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक पदासाठी वर्णी लागावी म्हणून बढतीसाठी प्रसिद्ध केलेल्या ज्येष्ठता यादीत हक्कदारांना खाली टाकून या अधिकाऱ्याला ज्येष्ठतेत वरिष्ठ असणाऱ्या लोकांपेक्षा वरच्या स्थानी दाखविले आहे.

इथवर न थांबता या अधिकाऱ्याला अंतर्गत लेखापरीक्षण विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार अन्य वरिष्ठ हक्कादारांना डावलून देण्यात आला आहे. हा भ्रष्ट अधिकारी अर्थोपाय या 'अर्थ' पूर्ण विभागात किमान ३० वर्षे ठाण मांडून होता आणि आता त्याला ४३ हजार ५०० कोटी रुपयांच्या आर.डी.एस.एस. स्कीमच्या लेखापरीक्षणाची जबाबदारी असणाऱ्या अतिशय 'मलाईदार' विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला आहे. ते सुद्धा अन्य अधिकाऱ्यांना डावलून.

अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी

याविरुद्ध महाराष्ट्र राज्य राष्टीय वीज कामगार फेडरेशन इंटक, संघटनेने आवाज उठविला आहे. त्यांनी प्रशासनाच्या या पद्धतीवर हल्लाबोल करून भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या या बदनाम अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली असून, या अधिकाऱ्यांची इतरांना डावलून बढतीसाठी वर्णी लागल्यास संघटना गप्प बसणार नाही, असे इंटक संघटनेचे मुख्य प्रवक्ते राकेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. मनमानी करून या बदनाम अधिकाऱ्याची अंतर्गत लेखा परीक्षण विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापक पदाच्या बढतीसाठी वर्णी लागल्यास व हक्कदारांना डावलल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पत्रकात दिला आहे. अशी माहिती मुख्य संपर्क प्रमुख अनिल गोसावी यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in