नवी मुंबईत मतदार यादीचा घोळ कायम; कुठे नावे अन्यत्र वळवली, तर कुठे नावे वगळली

Maharashtra assembly elections 2024 : मतदान होईपर्यंत मतदार यादीतील संभ्रम संपत नाही. अचानक नाव कमी होणे, अन्यत्र वळवले जाणे, असे प्रकार होत असतात. असाच प्रकार कोपरखैरणे येथे समोर आला असून सेक्टर आठ येथील शेकडो मतदारांची नावे कोपरखैरणेत अन्यत्र, तर अनेक घणसोलीत वळवण्यात आली आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी मुंबई : मतदान होईपर्यंत मतदार यादीतील संभ्रम संपत नाही. अचानक नाव कमी होणे, अन्यत्र वळवले जाणे, असे प्रकार होत असतात. असाच प्रकार कोपरखैरणे येथे समोर आला असून सेक्टर आठ येथील शेकडो मतदारांची नावे कोपरखैरणेत अन्यत्र, तर अनेक घणसोलीत वळवण्यात आली आहेत. तसेच अनेक नावे वगळण्यात आली आहेत. लोकसभेत ज्या ठिकाणी मतदान केले त्या ऐवजी अन्यत्र नावे आल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र आता एवढ्या उशिरा नावे पुनर्स्थापित होणे शक्य नाही असे तोंडी सांगण्यात आले असल्याचा दावा तक्रारदार यांनी केला आहे.

ऐरोली विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या कोपरखैरणे सेक्टर ८ येथील यादी क्रमांक ३३८ आणि ३४० मधील सुमारे २५० मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. यातील अनेक नावे वगळण्यात आलेली आहेत, तर अनेक नावांचा समावेश ऐरोली, घणसोली तसेच कोपरखैरणे सेक्टर १५, सेक्टर २, सेक्टर २३, सेक्टर १९ येथील मतदार यादीत करण्यात आला आहे, असे तक्रारदार रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले.

पहिलीच संधी असल्याने लोकसभेला रा. फ. नाईक महाविद्यालयातील मतदान केंद्रावर उत्साहात मतदान केले. मात्र आता विधानसभा निवडणुकीसाठी माझे नाव मतदार यादीत आढळून आले नाही. शोधाशोध केली असता ते घणसोलीतील यादीत गेल्याचे दिसून आले आहे. आता नक्की काय करावे याची मलाही माहिती नाही.

- आकाश कटमनी, मतदार

एखाद्या राजकीय घटकाने, व्यक्तीने एकत्रित असे केलेले असू शकते. याबाबत पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मतदान केंद्र बदल वा अन्य यासाठी अर्ज करून मतदारांनी स्वतःची कागदपत्रे देत नाही तो पर्यंत त्यांची नावे अन्यत्र वळवता येत नाहीत.

- सुचिता भिकाने, निवडणूक अधिकारी, ऐरोली

logo
marathi.freepressjournal.in