उरण ते नेरूळ लोकल मार्गावर असुविधांची गर्दी; प्रवाशांची नाराजी, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

या स्थानकांत बसविण्यात आलेले सरकते जीने ही बंद आहेत. याचा सर्वांत अधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे.
उरण ते नेरूळ लोकल मार्गावर असुविधांची गर्दी; 
प्रवाशांची नाराजी, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण : नेरूळ/बेलापूर मार्गाला उरणच्या प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. मात्र येथील खारकोपर दरम्यानच्या उरण, द्रोणागिरी, न्हावाशेवा व शेमटीखार या चारही स्थानकात अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. येथील अपूर्ण कामांमुळे नागरिकांनी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.

उरण ते नेरूळ आणि बेलापूर लोकल मार्गावरील रेल्वे स्थानकात प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे. यामध्ये उरण स्थानकात स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. स्थानकाच्या पूर्वेला प्रवेश करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. तर द्रोणागिरी स्थानक हे बोकडवीरा गावाच्या हद्दीत आणि गावालगत असतांनाही बोकडवीरा गावातील प्रवाशांना स्थानकात जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही. पुढील न्हावाशेवा (नवघर) स्थानकाच्या पश्चिमेला जाण्यासाठी असलेला मार्ग नादुरुस्त आहे.

सिडकोच्या सेक्टर ११ मधून जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. तर पूर्वेला तिकीट घर नसल्याने प्रवाशांना पागोटे, द्रोणागिरी, नवघर,भेंडखळ तसेच खोपटे खाडी पलीकडील गावातील प्रवाशांना जिने चढून यावे जावे लागत आहे. रेल्वे स्थानकातील असुविधांची माहिती घेऊन अपूर्ण कामासंबंधी त्या त्या विभागाला कळविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली आहे.

चाकरमानी, अधिकाऱ्यांना फटका

या स्थानकांत बसविण्यात आलेले सरकते जीने ही बंद आहेत. याचा सर्वांत अधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. अशीच स्थिती शेमटीखार (रांजणपाडा) या दोन्ही स्थानकात प्रवाशांना पायऱ्या चढून फलाटावर जावे लागत आहे. यासर्व असुविधांचा सामना करीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तर या मार्गावरील गव्हाण-जासई आणि तरघर या रेल्वेस्थानकांची कामे अपुर्ण असल्यामुळे या स्थानकांमध्ये रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथील लोकांना त्याचा फायदा होत नाही. उरण रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये देखील मोठे अंतर असल्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर ताटकळत रहावे लागते. तसेच रात्री साडे नऊ नंतर कोणतीही लोकल सुरू नसल्यामुळे चाकरमानी तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in