कॉपी केल्यास शिक्षण थांबणार

परीक्षा केंद्रात कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला पुढील पाच परीक्षांना बसता येणार नाही.
कॉपी केल्यास शिक्षण थांबणार
Published on

अलिबाग : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असून इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल विभाग व जिल्हा परिषदेची पाच भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर एक पथक नियुक्त करण्यात आले आहे.

परीक्षा केंद्रात कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला पुढील पाच परीक्षांना बसता येणार नाही. त्याचबरोबर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील आठ प्रांताधिकारी, १५ तहसीलदार, नायब तहसीलदार, पंचायत समित्यांचे १५ गटविकास अधिकारी, माध्यमिक, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी, जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे (डायट) प्राचार्य, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.

प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती

परीक्षा केंद्रावर अंगणवाडी पर्यवेक्षक, महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी, जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. बैठे पथकात एकूण तीन सदस्य असतील, त्यात एक महिला असणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर रहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही नव्याने परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेतली जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in