APMC मध्ये कोथिंबीर तेजीत; स्वयंपाकघराची चवच बिघडली, जुडीचा भाव थेट ४५ रुपयांवर, आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

जेवणाची चव आणि सुगंध वाढवणारी कोथिंबीर आता ताटात वाढण्यापूर्वी १० वेळा विचार करण्याची वेळ आलीये. मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारांत कोथिंबीरची एक जुडी चक्क ४० ते ४५ रुपयांवर पोहोचलीये. एपीएमसी मार्केटमधील आवक थेट ५० टक्क्यांनी घटल्याने...
APMC मध्ये कोथिंबीर तेजीत; स्वयंपाकघराची चवच बिघडली, जुडीचा भाव थेट ४५ रुपयांवर, आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
Published on: 

नंदकुमार ठाकूर / नवी मुंबई

जेवणाची चव आणि सुगंध वाढवणारी कोथिंबीर आता ताटात वाढण्यापूर्वी १० वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. मुंबई आणि परिसरातील किरकोळ बाजारांमध्ये कोथिंबीरची एक जुडी चक्क ४० ते ४५ रुपयांना विकली जात आहे. एपीएमसी मार्केटमधील घाऊक बाजारातही कोथिंबीरचे दर भडकले असून, आवक रोडावल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

नाशिक, पुणे, साताऱ्या उत्पादक पट्ट्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामानातील लहरीपणाने शेतातच कोथिंबीर सडली. त्यातच वाहतूक खर्च वाढल्याने एपीएमसी मार्केटमधील आवक थेट ५० टक्क्यांनी घटली आहे. बाजारात मागणी प्रचंड आणि पुरवठा अल्प, अशी स्थिती निर्माण झाल्याने चांगल्या दर्जाच्या कोथिंबीरचे भाव गगनाला भिडले आहेत.

स्थानिक आणि इतर जिल्ह्यांमधील नवीन पिकांची काढणी पूर्ण होऊन बाजारात आवक सुरळीत होईपर्यंत ग्राहकांना या महागाईचा सामना करावा लागणार आहे. पालेभाज्यांच्या सततच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

पावसामुळे उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. एपीएमसीमध्ये मालच कमी येत असल्यामुळे आम्हाला घाऊक बाजारातच जास्त दर द्यावा लागत आहेत. जोपर्यंत नवीन आवक मोठ्या प्रमाणावर बाजारात येत नाही, तोपर्यंत दर असेच वधारलेले राहण्याची शक्यता आहे.

रमेश शिंदे, घाऊक भाजीपाला व्यापारी, एपीएमसी मार्केट, वाशी.

भाजी आधीच महाग होती, पण आता कोथिंबीरची एक जुडी ४० ते ४५ रुपयांना विकत घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अत्यल्प दरात मिळणारी कोथिंबीर आज भाजीपेक्षाही महाग झाली आहे.

रजनी पाटील, गृहिणी, वाशी

logo
marathi.freepressjournal.in