पेणमध्ये एकवटले महाराष्ट्रातील गणेश मूर्तिकार; पीओपीव‌रील विघ्न लवकरच दूर करू - अनिकेत तटकरे

केंद्र सरकारने गणेश मूर्तीसाठी लागणाऱ्या पीओपी मातीवर जी बंदी घातली आहे, त्याविरोधात शनिवारी झालेल्या जाहीर सभेत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पीओ
पेणमध्ये एकवटले महाराष्ट्रातील गणेश मूर्तिकार; पीओपीव‌रील विघ्न लवकरच दूर करू - अनिकेत तटकरे
Published on

पेण : केंद्र सरकारने गणेश मूर्तीसाठी लागणाऱ्या पीओपी मातीवर जी बंदी घातली आहे, त्याविरोधात शनिवारी झालेल्या जाहीर सभेत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी पीओपीवरील बंदी कायमस्वरूपी उठवण्याचा निर्णय न्यायालयाला द्यावा लागेल, असे मत व्यक्त केले. यासाठी आदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एक समिती स्थापन करून योग्य अहवाल न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकारला भाग पाडून मूर्तिकारांवर आलेले विघ्न दूर करण्याचे सांगत मूर्तिकारांच्या लढ्याला पाठिंबा दिला.

हमरापूर विभाग गणेश मूर्तिकार उत्कर्ष मंडळाने राज्यातील सर्व गणेश मूर्तिकार, मूर्तिकार संघटना आणि गणेश मंडळांच्या पदाधिकारी आणि मूर्तिकारांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी मूर्तिकरांना मार्गदर्शन करताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्यावर जे पीओपीचे विघ्न आले आहे, ते विघ्न हा विघ्नहर्ता नक्कीच दूर करेल, असे सांगितले.

मागील वेळी विधिमंडळात मी हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपात ही बंदी उठवली होती. मात्र आता आपल्याला असा लढा द्यायचा आहे, की ही पीओपीवरील बंदी कायमस्वरूपी उठवण्याचा निर्णय न्यायालयाला द्यावा लागेल, असे मत माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आपला हा बंदी उठवण्याचा लढा मंत्री आदिती तटकरे, पंकजा मुंडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासमवेत एक समिती स्थापन करून योग्य अहवाल न्यायालयात सादर करण्यास राज्य सरकारला भाग पाडूया. विघ्नहर्ता आपल्यावर आलेले हे विघ्न नक्कीच दूर करेल, हा संकटमोचक बाप्पा आपल्यावरील संकट नक्कीच दूर करेल असे सांगून मूर्तिकारांच्या लढ्याला पाठिंबा दिला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी देखील आपला पाठिंबा दिला.

प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून पीओपी मूर्तींवर बंदी आणायचा प्रयत्न झाला तर येथील लाखो व्यावसायिक बेघर होतील. त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारखानदारांची बाजू मांडली आहे आणि त्यांनी या बाजूला दुजोरा दिला आहे आणि मला वाटत नाही की या मूर्तींमुळे प्रदूषण होत आहे.

- रवींद्र पाटील, आमदार, पेण

मूर्तिकार आणि मूर्तिकारांचा व्यवसाय जगाला पाहिजे या उद्देशाने आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, जेएसडब्ल्यु कंपनीच्या रोजगारापेक्षा गणपती कारखानदारांच्या माध्यमातुन अधिकचा रोजगार मिळत आहे, मात्र कंपनीचे प्रदूषण कोणी बघत नाही, मूर्तीच्या माध्यमातून प्रदूषणाकडे बघितले जाते ही चुकीची गोष्ट आहे,कारखानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहणार.

- धैर्यशील पाटील, खासदार ( राज्यसभा )

शासनाच्या गाइडलाइनचा निषेध

पीओपी बंदीमुळे गणपती कारखानदार आणि त्यावर निगडित असणारे लाखो हात बेरोजगार होणार आहेत. शासनाने मूर्तिकारांना विश्वासात न घेता जी गाइडलाइन दिली आहे त्याचा आम्ही निषेध करत असून वर्षातून दोन वेळा होणाऱ्या गणेशोत्सवातून प्रदूषण होत आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर राज्यातील कंपन्यांमार्फत जो प्रदूषण होत आहे तो तुम्हाला दिसत नाही का असा सवाल उपस्थित करून आम्ही आमचा लढा न्याय मिळेपर्यंत लढत राहू.

- अभय म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना

logo
marathi.freepressjournal.in