ड्रग्ज माफियांविरोधात धडाकेबाज कारवाया; नवी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम; ३५३ आरोपी अटकेत

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०२३ या वर्षामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करून अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एकूण ३५३ आरोपींना अटक केली आहे
ड्रग्ज माफियांविरोधात धडाकेबाज कारवाया; नवी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम; ३५३ आरोपी अटकेत

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने २०२३ या वर्षामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाई करून अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एकूण ३५३ आरोपींना अटक केली आहे. तसेच २९० कारवायांमध्ये सुमारे २१ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहिमेद्वारे ७ महिलांसह ३० परदेशी नागरिकांची धरपकड करून अमली पदार्थाच्या तस्करीचे रॅकेट उद‌्ध्वस्त केले आहे. एकविसाव्या शतकातील शहर म्हणून नावारूपाला आलेल्या नवी मुंबई शहराला देखील अमली पदार्थाचा विळखा पडला आहे. नवी मुंबई परिसरात ड्रग्ज माफियांकडून तरुणांना ड्रग्ज विक्री करण्यात येत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाधिन होत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईत सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी व त्यामागे असलेले रॅकेट उद‌्ध्वस्त करून त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे.

शहरातील अमली पदार्थाचे रॅकेट उद‌्ध्वस्त करून त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व त्याचे सेवन करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थांसंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी अमली पदार्थविरोधी पथकाला अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी, सदर माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल.

- नीरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी पथक

गुटखा आणि हुक्का पार्लरवरसुद्धा धडक कारवाई

नवी मुंबई पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथकाने गत वर्षामध्ये गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखूच्या तस्करी प्रकरणात १०६ कारवाया करून १८२ आरोपींना अटक केली आहे. तसेच १ कोटी ७० लाख ४७ हजार ३३० रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी हुक्का पार्लरच्या ४१ कारवाया करून २२६ पुरुष व ७ महिला अशा एकूण २३३ जणांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी कोफ्टा कायद्यांतर्गत ३० कारवाया करून ४३ जणांना अटक केली आहे.

शाळा-कॉलेज परिसरात अमली पदार्थाची खरेदी-विक्री

नवी मुंबईतील शाळा-कॉलेज व झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्ट्यांमधून गांजा, चरस गुटखा यासारखे अमली पदार्थ महिला व भिकाऱ्यांच्या माध्यमातून विकण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.

३७ परदेशी नागरिकांचा समावेश

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तसेच आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी २०२३ या वर्षामध्ये अमली पदार्थाशी संबंधित एकूण २९० गुन्हे दाखल करून ३५३ आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात ७ महिलांसह ३७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या कारवाईत सुमारे २१ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यात ९ कोटी ३३ लाख ३४ हजार रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रॉन), ५ कोटी ९६ लाख रुपये किमतीचे ७ किलो ४२९ ग्रॅम वजनाचे मेथ्यॅक्युलॉन, ३ कोटी ६४ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १८२ किलोच्या १०० ग्रॅम वजनाच्या थर्माडोल टॅबलेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.

२१ कोटी १३ लाखांचे अमली पदार्थ जप्त

त्याचप्रमाणे १ कोटी २५ लाख २० हजार रुपये किमतीचे कोकेन, २३ लाख ८४ हजार रुपये किमताचे ५९६ ग्रॅम वजनाचे एम्फेटामाईन, २२ लाख १० हजार रुपये किमतीच्या २२१ एमडीएमएच्या गोळ्या, १९ लाख ८० हजार रुपये किमतीचे एलएसडी पेपर, १५ लाख ४० हजार रुपये किमतीचा ३ किलो ६४५ ग्रॅम वजनाचा चरस, ८ लाख ४७ हजार रुपये किमतीचा ५३ किलो ६८५ ग्रॅम वजनाचा गांजा, २ लाख ८ हजार ३३३ रुपये किमतीचे कोडाईन सिरप, १ लाख ७८ हजार ९२० रुपये किमतीचे ब्राऊन शुगर, ३३ हजार १६० रुपये किमतीचे हेरॉईन, ७६९२ रुपये किमतीचे नेट्राझेपेम टॅबलेट्सच्या १४ स्ट्रीफ्स, असे एकूण २१ कोटी १३ लाख ३७ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in