नवी मुंबई : नवी मुंबईतील ३०० हून अधिक आघाडीच्या विकासकांचे प्रतिनिधित्व करणारी अग्रगण्य संस्था क्रेडाई-बीएएनएम तर्फे आयोजित २४ वा नवी मुंबई प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. १२ ते १५ डिसेंबरदरम्यान चालणाऱ्या या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वर्षीच्या एक्स्पोची संकल्पना ‘नवी मुंबई : भविष्याची धावपट्टी’ अशी असून, शहराच्या जलद परिवर्तनाची, नव्या प्रगत सुविधांची आणि आगामी विकास दिशेची अधोरेखित ओळख या संकल्पनेतून दाखवण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभप्रसंगी नमुंमपा सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, ‘बीएएनएम’चे अध्यक्ष रसिक चौहान, माजी अध्यक्ष वसंत भद्रा, उपाध्यक्ष ओमप्रकाश छाजेड, सेक्रेटरी जीगर त्रिवेदी, खजिनदार शैलेश पटेल, को-कन्वेनर महेश पटेल, हितेश गामी तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनस्थळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचा उत्साह वाढविला.
२४ व्या प्रॉपर्टी एक्स्पोचे नेतृत्व संयोजक महेश पटेल, सह-संयोजक झुबिन संघोई आणि हितेश गामी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, उत्कृष्ट अनुभव आणि भव्य सादरीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा (डिसेंबर २०२५), मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (मे २०२६), नवी मुंबई मेट्रोचे विस्तारणारे जाळे, कोस्टल रोड, पाम बीच रोडचे अपग्रेडेशन, विरार-अलिबाग मल्टी-मॉडल कॉरिडॉर, एज्युकेशन सिटी, एअरो सिटी, नैना, पुष्पक नगर यांसारखे प्रगत प्रकल्प या सर्वांमुळे नवी मुंबई देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रांपैकी एक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर हा एक्स्पो खरेदीदार, गुंतवणूकदार आणि विकासक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती क्रेडाई-बीएएनएमचे अध्यक्ष रसिक चौहान यांनी दिली. सिडकोने नूकतेच जाहिर केलेली ४५०८ घरांच्या योजनेतील २२ लाख रूपयांच्या घरांचे विशेष स्टॉल सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. मनिष भतिजा संचलित पॅराडाईस ग्रुपच्या प्रकल्पाकडे गुंतवणूकदारांची विशेष गर्दी होत आहे. शहरातील वाढत्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी १४ डिसेंबर रोजी गृहनिर्माण संस्थांसाठी पुनर्विकासावरील विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वॉक टू वर्क’ संकल्पनेला बळकटी, आधुनिक जीवनशैलीला वेग आणि परिसर अधिक गतिशील करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमात असल्याचेही चौहान यांनी नमूद केले.
या प्रदर्शनाचे टायटल स्पॉन्सर ईव्ही होम्स यांनी दाखल होताच विमानाची प्रतिकृती उभारून त्यांच्या विविध प्रकल्पांचे आकर्षक सादरीकरण केले आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळच उभारण्यात आलेला विमानतळ क्षेत्राचा अनुभव देणारा ‘बोर्डिंग पास’ आधारित प्रवेश ज्यामुळे पाहुण्यांना प्रदर्शनात पाऊल ठेवताच एका वेगळ्या जगात प्रवेश केल्याची अनुभूती मिळत आहे.या ग्रुपमध्ये खारघरमधील ४० मजली प्रकल्पातील प्रत्येक घरात स्वतंत्र तरणतलाव असलेली १० कोटी रुपयांची आलिशान घरे पाहून नवी मुंबईच्या बदलणाऱ्या जीवनशैलीचे भविष्यचित्र येथे स्पष्टपणे उमटत आहे.
५०० पेक्षा अधिक प्रकल्प
या प्रॉपर्टी प्रदर्शनात २० लाख रुपये ते २० कोटी रुपयांपर्यंतच्या किंमत श्रेणीतील १०० हून अधिक विकासकांचे ५०० पेक्षा अधिक प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. निवासी, व्यावसायिक, टाऊनशिप आणि लक्झरी अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांमुळे घरखरेदीदारांना एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध होणार आहेत. तसेच वित्त भागीदारांसाठी स्वतंत्र झोन, कर्ज सुविधा, गुंतवणूक मार्गदर्शन इत्यादींची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.