प्रतिनिधी/ नवी मुंबई: २०२३ हे वर्ष नवी मुंबई पोलिसांची कामगिरी उंचावणारे असले, तरी काही पारंपरीत गुन्ह्यांना अद्याप आळा घालण्यात यश आले नाही. या वर्षात सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे सायबर पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याची नितांत गरज होती. नवी मुंबई पोलिसांना २०२३ हे संमिश्र गेले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची नोंद जरी जास्त झाली असली, तरी गुन्हे उकल टक्केवारीत ८ टक्क्यांनी प्रगती आहे. २०२२ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान ५ हजार ८११ विविध गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर ३ हजार ७८४ गुन्ह्यांची उकल झाली होती, तर २०२३ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान ६ हजार १२८ गुन्ह्यांची नोंद तर ४ हजार ४८० गुन्हे उकल करण्यात आले. २०२२ च्या तुलनेत २३ मध्ये गुन्ह्यांची नोंद जास्त असली, तरी २०२२ मध्ये एकूण ६५ टक्के गुन्हे उकल झाली, तर यंदा हेच प्रमाण ७३ टक्के झाले आहे.
शहरात आत्महत्येच्या प्रमाणात तब्बल ९ने वाढ झाली असून, २०२२ मध्ये ९ जणांनी आत्महत्या केल्या होत्या, तर २०२३ मध्ये २३ जणांनी स्वतः होऊन आपले जीवन संपवले. महिला अत्याचारात किंचित घट झाली असून, २०२२ मध्ये ६८८ घटनांची नोंद झाली होती. तर २०२३ मध्ये ६८१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पोलीस शिस्त : पोलिसांना शिस्त लावताना आयुक्त मिलिंद भांबरे यांनी कुठलाही मुलाहिजा बाळगला नाही. युवतीची छेडछाड करणाऱ्या हवालदारावर तात्काळ निलंबन कारवाई केली. त्याचप्रकारे कर्तव्यात कुसूर करणाऱ्या ३२ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यावर निलंबन कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात पाचपेक्षा अधिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नवी मुंबईला खऱ्या अर्थाने वाहतूक शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न यंदाच्या वर्षी करण्यात आला आहे.
सायबर पोलीस ठाणे : ११ मे २०२३ ला आयुक्तालय क्षेत्रातील पहिले सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले. सायबर पोलीस ठाण्याची स्थापना केल्यापासून या ठिकाणी ३४ गुन्हे दाखल झाल्यापैकी ६ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या ३४ गुन्ह्यांत एकूण १७ कोटी ८८ लाख १८ हजार ३६३ रुपयांची फसवणूक करण्यात आली तर गुन्हे उकलमध्ये आरोपींच्या खात्यातील ३५ कोटी ८९ लाख ९९ हजार १८१ रुपये गोठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे देशातील इतर पोलीस ठाण्यांचेही अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर आतापर्यंत १५ आरोपींना अटक करण्यात आले आहे. २०२३ मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान एकूण ३२३ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. त्या पैकी ४९ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले. या गुन्ह्यात २३ कोटी ५२ लाख ५८ हजार ४६३ रुपयांची फसवणूक झाली; मात्र रक्कम गोठविण्यात यश आले नाही.
गुन्हे प्रकार गुन्हा उकल
हत्या ३५ ३२ ३७ ३६
हत्येचा प्रयत्न ५३ ५३ ४४ ४४
दरोडा ३ ३ ६ ५
साखळी चोरी १०० ६३ १३४ ४९
मोबाईल चोरी ९३ ६८ ५४ ३६
घरफोडी ६५४ १८६ ३५६ ११९
चोरी २,१५२ १०८३ २२०९ ७०७
आत्महत्या २३ २३ ९ ९
महिला अत्याचार १९५ १९५ २०१ २०१
अपहरण ३७१ ३२५ ३४० २८०
खंडणी ३३ ३० १७ १३
अपघाती मृत्यू २४० १८३ २७१ १९५
एकूण ६,१२८ ४,४८० ५,८११ ३,७८४