सायबर चोरट्याकडून महिला पोलिसाला दोन लाखांचा गंडा

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदाराचे बँक खाते हॅक करून त्यांच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम...
सायबर चोरट्याकडून महिला पोलिसाला दोन लाखांचा गंडा

नवी मुंबई : मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदाराचे बँक खाते हॅक करून त्यांच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम अज्ञात सायबर चोरट्याने परस्पर दुसऱ्या खात्यामध्ये वळती करून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला हवालदार ऐरोलीमध्ये राहण्यास असून त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. या महिला पोलीस हवालदार गत मार्च महिन्यामध्ये सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपल्या कामावर जात असताना, अज्ञात सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यात असलेली सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम परस्पर दुसऱ्या बँक खात्यात वळती करून घेतली. याबाबतचा मेसेज महिला हवालदाराच्या मोबाईलवर आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या बँकेत धाव घेऊन त्याबाबत चौकशी केली. त्यांनतर अज्ञात व्यक्तीने त्यांचे बँक अकाऊंट हॅक करून त्यांच्या बँक खात्याला संलग्न असलेला ईमेल आयडी बदलून त्यांच्या खात्यातून सव्वा दोन लाख रुपये परस्पर आपल्या बँक खात्यात वळती करून घेतल्याचे बँकेच्या मॅनेजरने सांगितले. तसेच त्यांचे पैसे वडाळा पूर्व चांदनीनगर येथील अंकीत पाल या व्यक्तीच्या खात्यावर गेल्याची माहिती सुद्धा दिली. त्यानंतर या महिला पोलीस हवालदाराने सायबर पोर्टलवर व त्यानंतर रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in