उरण : रविवारी जखमी अवस्थेत सापडलेल्या दुर्मिळ 'ए लेसर नॉडी' या पक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भारतात क्वचितच आढळणाऱ्या मालदिवचा हा पक्षी रविवारी सीवूड्स एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये दिसला होता. या पक्षाचे शास्त्रीय नाव ‘ॲनस टेन्युरोस्ट्रिस’ असे आहे. हा पक्षी लांब चोचीने धडपडताना दिसल्याने एनआरआय कॉम्प्लेक्सचे रहिवासी दीपक रामपाल यांनी वन्यजीव कल्याण संघटनेच्या (डब्ल्यूडब्ल्यूए) संपर्क साधला.
वन्यजीव कल्याण संघटनेने या जखमी पक्षाला डब्लूडब्ल्यूए वन्यजीव पुनर्वसन केंद्र मानपाडा, ठाणे येथे नेण्यात आले, जे सुमारे ३० किमी दूर आहे; मात्र दुर्दैवाने पक्ष्याला वाचवता आले नाही, असे बचावकर्ते सनप्रीत सावर्डेकर आणि मयूर दळवी यांनी सांगितले.
नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने या लेसर नॉडी या पक्षाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. यापुर्वी देखील नवी मुंबईत फ्लेमिंगो आणि इतर अनेक पक्षांचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे.
मॉरिशियन वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, समुद्री पक्षी महत्त्वाची सागरी पोषक तत्वे आणून जमिनीला सुपीक बनविण्यास मदत करतात. पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे वनस्पती आणि कीटकांची संख्या वाढण्यास मदत होते, त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीला मदत होते.