अधिक फायद्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; ९३ लाख ३० हजार २७२ रुपयांचा अपहार

सानपाडा येथे राहणारे विश्वनाथन राजमानिकम यांना २५ डिसेंबरला व्हॉट्सॲपवर टायगर कॅपिटल एल ३ नावाच्या समूहात सामील करून घेतले.
अधिक फायद्याचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक; ९३ लाख ३० हजार २७२ रुपयांचा अपहार

नवी मुंबई : नवी मुंबईत तीन जणांची ९३ लाख ३० हजार २७२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत दोन दिवसात वेगवेगळे तीन गुन्ह्यांची नोंद सायबर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सानपाडा येथे राहणारे विश्वनाथन राजमानिकम यांना २५ डिसेंबरला व्हॉट्सॲपवर टायगर कॅपिटल एल ३ नावाच्या समूहात सामील करून घेतले. यावर सट्टा बाजाराविषयी चर्चा आणि ज्यांना भरघोस नफा मिळाला त्याच्या खात्याचे स्क्रीनशॉट टाकले जात होते. त्याला भुलून विश्वनाथन यांनी निशा गुप्ता यांना सट्टाबाजारात गुंतवणूक करण्याविषयी माहिती विचारली. त्यावर गुप्ताने टायगर ॲप्लिकेशन नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार विश्वनाथन यांनी हे केले. सुरवातीला त्यांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्याला चांगल्यापैकी परतावा मिळाला, मात्र हा परतावा थेट बँक खात्यात न येता केवळ त्या ॲप्लिकेशनवर आल्याचे दिसत होते. त्यानंतर अशाच प्रकारे आमिष दाखवून वेगवेगळ्या खात्यावर एकूण ६७ लाख ८ हजार ९९२ रुपये पाठवले. त्याचा परतावा अप्लिकेशनवर दिसत होता, मात्र खात्यात जमा होत नव्हता. याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या प्रकरणात भांडुप येथे राहणारे निलेश गावंडे हे नवी मुंबईतील ऐरोली स्थित टेक्नॉलॉजी सोल्युशनसारख्या कंपनीत काम करतात. २३ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सहज मोबाईल हाताळत असताना एक लिंक त्यांना आली त्यावर क्लिक केले असता ऑल स्टोक अकॅडमी या व्हॉट्सॲप समूहात त्यांचा समावेश झाला. त्या समूहाचे तीन प्रशासन (ॲडमिन) होते. त्यातील हरीश सदानी हे प्रोफेसर होते, जे सट्टाबाजारात गुंतवणूक कशी करावी याची माहिती देत होते. गुंतवणूकबाबत माहिती मिळाल्यावर निलेश यांनी १५ जानेवारीला गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याची समूहावर कळवले. त्यावेळी व्हीआयपी ६५ नावाच्या व्हॉट‌्सॲप ग्रुपमध्ये निलेश यांचा समावेश झाला. सुरुवातीला काही पैसे भरल्यावर दोन दिवसात चांगला परतावा मिळाला. त्यामुळे निलेश यांचा विश्वास बसला. त्यामुळे ४ लाख ३० हजार ५०० तर दुसऱ्यांदा ५ लाख ४५ हजार ३०० अशी रक्कम निलेश यांनी देत आयपीओ विकत घेण्यासंबंधी चर्चा सुरू केली. दरम्यान विविध कारणे देत २ लाख ९२ हजार दिले. मात्र त्यानंतर काही दिवसात पुन्हा १ लाख ६१ हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. मात्र हे पैसे देण्यास नकार दिल्यावर या दरम्यान जे चारजण संपर्कात होते त्या सर्वांनी संपर्क बंद केला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे निलेश यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जाची शहानिशा करून पोलिसांनी आर्थिक फसवणूक अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

तिसऱ्या प्रकरणात धवल रामतीर्थकर हे जाहिरात क्षेत्रात काम करत असून त्यांना फेसबुकवर एक संदेश आला होता त्यानुसार १४ लाख दोन हजार २८० एवढी रक्कम गुंतवली त्याचा परतवा त्यांच्याकडे उघडण्यात आलेल्या खात्यात दिसत होता. मात्र धवल यांच्या खात्यात वळती केला जात नव्हता. त्यात वारंवार पैशांची मागणी होत असल्याने फसवणूक होत असल्याचे धवल यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी शेवटी याबाबत दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in