राज्यातील मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय लवकरच; अजित पवार यांचे सूतोवाच

अल्पसंख्यांक विकासासाठी गेल्यावर्षी ५०० कोटी दिले, यावर्षी १५०० कोटी देण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी उर्दू हाऊस नांदेड नागपूर मालेगाव सोलापूर स्थापन केले.
राज्यातील मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय लवकरच; अजित पवार यांचे सूतोवाच

नवी मुंबई : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा जळगाव येथे केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या मुलींना मोफत शिक्षणाबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्यांक मेळाव्यात दिली.

नवी मुंबईत रविवारी पार पडलेल्या या मेळाव्यात वक्फ बोर्डबाबत अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. या वर्षी मुस्लीम समाज विकासाठी १५०० कोटींचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. विशेष म्हणजे आम्ही सरकारमध्ये सामील झालो असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवारांनी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्दे स्पष्ट केले. अल्पसंख्यांक लोकांना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे कार्य केले आहे. काही लोक मुस्लीम समुदायात भयाचे वातावरण निर्माण करून आपली राजनीती चालवतात. आम्ही सर्व एकसाथ मिळून राज्य करीत आहोत. राज्यातील जनतेच्या सुरक्षेची जवाबदारी सरकारची आहे. आम्ही अल्पसंख्यांक जनतेचा आदर करतो त्यांना प्रतिनिधित्व देतो. असे सांगत त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी मुस्लीम लोकांना दिलेले प्रतिनिधित्वाची यादीच त्यांनी वाचून दाखवली. छ. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लीम सैनिक होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर मुस्लीम समाजाने कायम विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. विकास कार्यात सर्वांना सोबत घेऊन जाणार आहेत. बाबा सिद्दीकी काही दिवसापूर्वी आमच्या सोबत आले. त्यांच्या मदतीने मुस्लीम समाजाचे प्रश्न अधिक स्पष्ट होऊन उपाययोजना करता येईल. मुस्लीम युवतींना शिक्षणात मदत केली जाईल.

वक्फ बोर्ड जमिनीबाबत अनेक समस्या आहेत. असे काही लोकांनी आम्हाला सांगितले. वक्फ बोर्ड जमिनीबाबत लक्ष घेत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी काही लोकांनी केली आहे. याबाबत काही सूचना ही आम्ही दिल्या आहेत. राज्य सरकार याबाबत प्रयत्नशील आहे.

कायद्याचे पालन केले जाईल

अल्पसंख्यांक विकासासाठी गेल्यावर्षी ५०० कोटी दिले, यावर्षी १५०० कोटी देण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी उर्दू हाऊस नांदेड नागपूर मालेगाव सोलापूर स्थापन केले. यापुढे छ. संभाजी नगर, भिवंडी, परभणी धुळे येथेही उर्दू हाऊस निर्माण करणे विचाराधीन आहे. आम्ही विचारधारा सोडल्याचे काही लोक सांगतील मात्र हे खर नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी सातारा येथे दोन समुदायात दंगली झाल्या. मी स्वतः पीडित लोकांना भेटलो, मीरा-भाईंदर येथे दोन समाजात झालेला वाद मला कळल्यावर असिफ शेख आणि इतरांशी बोलणे झाले त्यावेळी पोलिसांच्या समन्वयाने एक शिष्टमंडळ पाठवले आणि शांतता राखण्याचा प्रयत्न केला. मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही. कायद्याचे पालन केले जाईल, असे आश्वासन पवारांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in