

उरण : गेल्या दोन महिन्यांपासून समुद्रापासून दूर राहिलेल्या कोळी बांधवांची प्रतीक्षा अखेर संपली असून, १ ऑगस्टपासून खोल समुद्रातील मच्छिमारी नौका पुन्हा समुद्रात झेपावणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत बाजारात ताजा, मुबलक आणि तुलनेने स्वस्त मासा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या निर्णयानंतर उरण परिसरातील किनाऱ्यांवर मच्छिमार आणि खलाशांची लगबग वाढली असून नौका समुद्रात उतरण्यासाठी अंतिम तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र शासनाने सुरुवातीला मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत जाहीर केला होता. मात्र, मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी २९ जुलै रोजी घेतलेल्या निर्णयानुसार १२ नॉटिकल मैलांपलीकडे मासेमारी करणाऱ्या नौकांना १ ऑगस्टपासून बंदीतून सूट देण्यात आली आहे. या निर्णयामुळे मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण असून नौकांची अंतिम तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. दरवर्षी जून आणि जुलै महिन्यांत माशांचा प्रजनन व अंडी घालण्याचा काळ असल्याने तसेच समुद्र खवळलेला असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालण्यात येते. या काळात मच्छिमार नौकांची दुरुस्ती, रंगरंगोटी, इंजिनांची देखभाल आणि मासेमारीच्या जाळ्यांची डागडुजी करून पुढील हंगामासाठी तयारी करतात.
स्थानिक मच्छिमारांचे आर्थिक नुकसान
राज्यात नारळी पौर्णिमा किंवा १५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू होत असे. मात्र, शेजारील राज्यांमध्ये १ ऑगस्टपासून मासेमारीला परवानगी मिळत असल्याने तेथील नौका महाराष्ट्राच्या समुद्री हद्दीत येऊन मासेमारी करत होत्या.राज्यातील सुमारे १५ लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असून महाराष्ट्रातून दरवर्षी सुमारे ४ लाख ६८ हजार मेट्रिक टन मासळीचे उत्पादन होते.
अंतिम तयारी सुरू
मच्छिमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. करंजा, मोरा आणि दिघोडे किनाऱ्यांवर नौकांवर अंतिम तयारी सुरू असून, १० ते १२ दिवस पुरेल इतका अन्नसाठा करून मच्छिमार समुद्रात उतरण्यास सज्ज झाले आहेत. नौका प्रथम ससून डॉक आणि भाऊचा धक्का येथे डिझेल व बर्फाचा साठा करून १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष मासेमारीला सुरुवात करणार असल्याची माहिती खलाशांनी दिली.