जनता राजा राणीचा पट उधळवून लावणार; जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांचे सत्ताधाऱ्यांना तडाखे

शंकराचार्य यांचे हिंदू धर्माच्या उभारणीस योगदान काय आहे, असे भाजपचे एक मंत्री बरळले आहेत.
जनता राजा राणीचा पट उधळवून लावणार;    जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांचे सत्ताधाऱ्यांना तडाखे

नवी मुंबई : नवी मुंबईतील दोन्ही सत्ताधारी आमदारांनी गेल्या १५ ते २० वर्षांत विकासकामांऐवजी एकमेकांवर कुरघोड्या करण्यात वेळ घालवला आहे. नवी मुंबईचे आपण सम्राट आहोत, अशा थाटात ते काहीही वल्गना करू लागले आहेत; मात्र हे शहर कुणाची जहागिरी नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या राजा-राणीचा पट जनता उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. राजा सध्या एका जागेच्या शोधात चिंताक्रांत आहे, तर राणीचा घोडा बुद्धीच्या शोधात चौफेर उधळला आहे. या घोड्यांना जोरदार लगाम लागणार आहे, असा घनाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी मंगळवारी केला.

बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी बेलापूरची मीच राणी, मार्गात येणाऱ्या सर्वच उंट आणि घोड्यांना आडवे करणार असे विधान केले होते. या विधानाचा शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी मंगळवारी खरपूस समाचार घेतला. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांनी गेल्या १५ ते २० वर्षांपासून नवी मुंबईचे नेतृत्व केले आहे. मात्र अपेक्षित असे विकास कामे त्यांच्याकडून झाले नाहीत. एकाच पक्षांमध्ये असूनही या दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवर कुरघुड्या सुरू आहेत. मंदा म्हात्रे यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी स्वतः राणी आहे असे विधान केले होते. त्यांच्या नजरेत उंट आणि घोडे कोण आहेत हे त्यांनाच माहिती. त्यांच्या चौफेर उधळलेल्या घोड्याला मात्र यावेळी लगाम लागणार आहे, असेही विठ्ठल मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

बेगडी हिंदुत्वाचा तोरा

शंकराचार्य यांचे हिंदू धर्माच्या उभारणीस योगदान काय आहे, असे भाजपचे एक मंत्री बरळले आहेत. या मंत्र्याचा साधा निषेधही करण्याची हिंमत भाजपवाल्यांमध्ये नाही. त्यामुळे त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे, असा टोलाही विठ्ठल मोरे यांनी यावेळी लगावला.

दिबांच्या नावाचा विसर

दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मोठमोठी आंदोलने झाली. त्याची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिबांच्या नावाचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर केला; मात्र त्यानंतर आलेल्या खोके सरकारने त्याची कोणती अंमलबजावणी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानात आले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी दिबांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नाही. नवी मुंबईतील या नेत्यांना दिबांच्या नावाचा विसर पडला आहे, अशी टीका विठ्ठल मोरे यांनी यावेळी केली.

logo
marathi.freepressjournal.in