पेण : लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी उमेदवारांनी जास्तीत जास्त तीन वाहने घेऊन यावीत, तर केवळ पाच व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश दिला जाईल, असे आदेश माहिती जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. तो घोषित केल्याच्या दिनांकापासून आचारसंहिता अंमलात आलेली आहे. जिल्हा दंडाधिकारी जावळे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. तसेच निवडणूक अर्ज दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
शासकीय कार्यालय परिसरात प्रचार सभांना बंदी
रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय ठिकाणी मिरवणूक, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करणे तसेच कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांनी लागू केले आहेत.