नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त आनंदाची बातमी

दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभागांना दिले
नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त आनंदाची बातमी

नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी २०२१-२२ वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना २७ हजार रूपये तसेच करार/ तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांना २१ हजार रुपये आणि आशा वर्कर यांना ११ हजार रूपये रक्कमेचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. यामुळे एकूण ४ हजार ४५४ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार असून दिवाळी सणापूर्वीच ही रक्कम अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सर्व विभागांना दिले आहेत.
     दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेचा आयुक्त पदाचा कार्यभार राजेश नार्वेकर यांनी स्वीकारला. यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी आणि महापालिकेचे दालन व विभागांची पाहणी आयुक्तांकडून करण्यात आली. नवे आयुक्त कसे आहेत? अशी सर्वसामान्य भावना महापालिका कर्मचारी- अधिकाऱ्यांची असतानाच आयुक्तांनी सर्व विभागातील कर्मचारी - अधिकाऱ्यांच्या आनंदात भर टाकली. महापालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच राज्य शासनाकडील बदलीने, प्रतिनियुक्तीने वा प्रशिक्षणार्थी असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना २७ हजार रूपये सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा नवनियुक्त आयुक्तांकडून करण्यात आली. त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पध्दतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी- कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक व मदतनीस यांना २१ हजार इतकी सानुग्रह अनुदान रक्कम तर सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्वावर नेमलेले व शासनाकडून मानधन प्राप्त होणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही करार पध्दतीवरील कर्मचाऱ्यांप्रमाणे २१ हजार इतके सानुग्रह अनुदान तसेच त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील आशा वर्कर यांना ११ हजार सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले. दिवाळी सणाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व विभागानं दिले असून नवी मुंबई महापालिका कर्मचारी -अधिकारी वर्गाची दिवाळी गोड होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in