पेण : पेण तालुक्यातील वाशी, शिर्की, खारेपाट भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून ७ डिसेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान आमरण उपोषण करून खारेपाटकरिता प्रस्तावित हेटवणे धरण ते वाशी, शिर्की, खारेपाट हा प्रस्तावित कालवा व रखडलेली पिण्याच्या पाण्याची पाइपलाईनसाठी सातत्याने गेल्या ५ वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदाेलनाकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण ठिकाणी चक्क गाढवाचे लग्न लावण्यात आले.
माजी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा अधिवेशनात आश्वासन दिले होते व तसे पत्र संबंधित कार्यकारी अभियंता हेटवणे मध्यम प्रकल्प विभाग कामार्ली यांना १४ डिसेंबर २०२३ रोजी लेखी स्वरूपात दिले होते. तसेच जलसंपदा मंत्री यांनी सदर प्रकल्पास १ महिन्यात मंजुरी देतो, असे आश्वासन देऊन आंदोलनकर्त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती सभागृहात केली होती, तदंनंतर खारेपाटातील ग्रामस्थांच्या परवानगीने व सभागृहात दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून सदर आंदोलन १४ डिसेंबर रोजी स्थगित करण्यात आले होते. परंतु जलसंपदा मंत्री यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून खारेपाट विकास संकल्प संघटनेने २४ फेब्रुवारी रोजी वाशी येथे पुन्हा उपोषण सुरू केले. शासन लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांनी गाढवाचे लग्न लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केले. जेणेकरून शासनाला जाग येऊन येथील पाणीप्रश्न सुटेल.
४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न
शेतकऱ्यांची पूर्वजांपासून चालत आलेली प्रथा आहे की, पाऊस पडला नाही किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता आली की येथील शेतकरी धोंड्या काढतात किंवा बेडकांची, गाढवांची लग्नं लावतात. असे केल्याने पाऊस पडतो तसेच पाण्याची कमतरता भासत नाही, अशी प्रथा आहे. उपोषणाची शासनाला जाग यावी तसेच पेण खारेपाट भागातील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या व शेतीच्या सिंचनासाठीचा पाणी प्रश्न मार्गी लागावा, या भावनेने येथील नागरिकांनी गाढवाचे लग्न लावले. यावेळी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू भाई पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शविला.