

नवी मुंबई : नवी मुंबईतील वेगाने विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. सेक्टर-४७ मधील अक्षर एस्टोनिया गृहसंकुलातील ३५० हून अधिक कुटुंबांना गेल्या अनेक दिवसांपासून अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.
सिडकोकडून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने सोसायटीला खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून, त्यासाठी दरमहा सुमारे पाच लाख रुपये खर्च होत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांत टँकरच्या पाण्यावर सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाल्याचे सोसायटीचे म्हणणे आहे.
द्रोणागिरीतील इतर अनेक गृहसंकुलांमध्ये अद्याप रहिवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता फारशी जाणवत नाही. मात्र, अक्षर एस्टोनियामध्ये ३५० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास असल्याने अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे.
कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सोसायटीच्या भूमिगत टाक्याही पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
घरासाठी मोठी रक्कम खर्च करून येथे राहायला आलो; मात्र मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी दररोज टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही वेळा पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने घरातील दैनंदिन कामांचे नियोजनही कोलमडते. टँकरच्या पाण्याच्या वापराबाबतही रहिवाशांमध्ये चिंता आहे. सिडकोने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी एका रहिवाशाने केली.
सिडकोचे पाण्याचे नियोजनही फसले
सिडकोकडून काही काळ सोसायटीला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, हे नियोजनही अपेक्षित पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने रहिवाशांचा त्रास कायम आहे. हेटवणे धरणातून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील तांत्रिक अडचणी आणि वारंवार होणाऱ्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे
रहिवाशांचे म्हणणे आहे. सिडकोकडून पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी त्यांचे योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अपेक्षित परिणाम मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
आमच्या सोसायटीत ३५० कुटुंबे असून सिडकोकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने दरमहा सुमारे पाच लाख रुपये टँकरच्या पाण्यासाठी खर्च करावे लागत आहेत. गेल्या तीन वर्षांत हा खर्च सुमारे दीड कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सिडकोकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला; मात्र अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता न्यायालयात दाद मागणार आहोत.
के. एन. भट, अध्यक्ष अक्षर एस्टोनिया सोसायटी
आरोग्याच्या प्रश्नाचीही चिंता
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरच्या पाण्याच्या वापराबाबत काही रहिवाशांनी आरोग्याशी संबंधित चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न हा केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्याशीही संबंधित असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. द्रोणागिरी नोडमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या लोकवस्तीच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. तात्पुरत्या स्वरूपात टँकरवर अवलंबून राहण्याऐवजी कायमस्वरूपी जलपुरवठ्याचे नियोजन करण्याची मागणी आता रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे सिडको प्रशासन या प्रश्नावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाय कधी करणार, असा सवाल अक्षर एस्टोनियातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.