मद्यधुंद उबेर चालकाचा प्रताप! विवाहितेसोबत गैरवर्तन, दुसऱ्या कारचालकाने पाठलाग करून अडवल्यानंतर....

मुलीला कारमध्ये लॉक करून सदर कार त्याने भरधाव वेगात जबरदस्तीने पळवून नेत विवाहितेसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली.
मद्यधुंद उबेर चालकाचा प्रताप! विवाहितेसोबत गैरवर्तन, दुसऱ्या कारचालकाने पाठलाग करून अडवल्यानंतर....

नवी मुंबई : मद्यधुंद अवस्थेत उबेर कार चालविणाऱ्या एका चालकाच्या प्रतापामुळे तो चांगलाच अडचणीत आला आहे. त्याच्या कारमधून सोमवारी रात्री प्रवास करणाऱ्या विवाहितेला व तिच्या मुलीला कारमध्ये लॉक करून सदर कार त्याने भरधाव वेगात जबरदस्तीने पळवून नेत विवाहितेसोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली. यावेळी विवाहितेने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या कारचालकाने उबेर कारचा पाठलाग करून वाशी ब्रीज खाली सदर कार अडवल्यानंतर उबेर चालकाने त्याच ठिकाणी कार सोडुन पलायन केले. वाशी पोलिसांनी या उबेर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेतील तक्रारदार विवाहिता मानसी सोनावणे (२८) ही कामोठे येथे राहण्यास असून, तिचे माहेर चेंबुर येथे आहे. गत रविवारी मानसी आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह माहेरी गेली होती. त्यानंतर ती सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उबेर करमधून चेंबुर येथून कामोठे येथे जात होती. सदर कार रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास वाशी टोल नाक्यावर आली असताना, उबेर कारचालक रामदास सुतार याने टोल नाक्यावर विनाकारण हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली. यावरून दुसऱ्या वाहन चालकासोबत रामदास सुतार याचा वाद झाला. त्यानंतर रामदास सुतार हा दारुच्या नशेत असल्याचे मानसीच्या लक्षात आले. त्यामुळे मानसीने वाशी टोल नाक्यावर मुलीसह सदर कारमधून उतरण्याचा प्रयत्न केला; मात्र चालक रामदास सुतार याने कारचे दरवाजे लॉक करून टोल न भरता कार वाशीच्या दिशेने तशीच पळवून नेली. यावेळी मानसीने आरडाओरड करत चालकास कार थांबवण्यास सांगितले असता, रामदास सुतार याने कारच्या भाड्याचे पैसे दिल्यानंतर कार थांबवणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे मानसीने त्याला पाचशे रुपयांची नोट दिल्यानंतर देखील त्याने कार न थांबवता सदर कार वाशीच्या दिशेने भरधाव वेगात पळवून नेली. याचवेळी मानसीच्या मदतीसाठी आलेल्या कार चालकाने आपली कार उबेर कारच्या पुढे लावून त्याची कार थांबवली. मात्र यावेळी रामदास सुतार याने आपली कार त्याच ठिकाणी सोडून पलायन केले. त्यानंतर मानसीने या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना देऊन वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in