म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

गेले महिनाभर ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (शिंदे गट) व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती.
म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

नवी मुंबई/ठाणे : गेले महिनाभर ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना (शिंदे गट) व भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरू होत्या. भाजपतर्फे संजीव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असतानाच शिवसेनेने (शिंदे गट) बाजी मारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली. म्हस्के यांचे नाव अचानक जाहीर झाल्याने ठाणे व नवी मुंबई भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. नवी मुंबईतील माजी ६४ नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले. यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवताना शिंदे गटाची दमछाक होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी मिळाल्यानंतर म्हस्के हे भाजपचे ज्येष्ठ नेते व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या भेटीसाठी गुरुवारी आले. तेव्हा त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आपल्याच कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात नाईक यांची दमछाक होत होती. शेवटी म्हस्के आणि आमदार सरनाईक यांना काढता पाय घ्यावा लागला. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलणेही टाळले. संजीव नाईक यांना अपक्ष उभे करण्याची एकमुखी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याच्या आशेपोटी माजी खासदार संजीव नाईक यांनी काही महिन्यांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत संपर्क प्रचंड वाढवला होता. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नवी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या ६४ माजी नगरसेवकांसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले. आम्ही शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. गणेश नाईक यांनीही कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकामागोमाग एक पदाधिकारी राजीनामा देत असल्याने म्हस्के आणि सरनाईक यांनी काढता पाय घेतला.

माजी मंत्री गणेश नाईक, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला, तर ‘मी ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो’, एवढे वाक्य बोलून नरेश म्हस्के निघून गेले. माजी खासदार संजीव नाईक हेच योग्य उमेदवार असताना मर्यादित प्रभाव असलेला उमेदवार खासदारकीसाठी दिला गेला. निवडून येण्याची शंभर टक्के खात्री असताना नाईक यांना बाजूला सारले त्याचा उद्वेग आज उमटला आहे, अशी प्रतिक्रिया नेत्रा शिर्के (स्थायी समिती, माजी सभापती) यांनी दिली.

मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे - गणेश नाईक

राष्ट्रहितासाठी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून देणे गरजेचे आहे. “अब की बार, ४०० पार’ पूर्ण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, अशी भूमिका आमदार गणेश नाईक यांनी मांडली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा सन्मान जागतिक स्तरावर वाढला. देशाचा आणि देशातील सर्व घटकांचा विकास झाला. देशाची सर्वांगीण प्रगती आणि सुरक्षेकरिता कार्यकर्त्यांनी एकदिलाने महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना निवडून देत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान करावे, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले आहे.

ठाण्याची लोकसभेची उमेदवारी शिवसेनेला गेल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा हजारोच्या संख्येने सामूहिक राजीनामे देऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी

ठाणे लोकसभेचा विकास करण्याची क्षमता संजीव नाईक यांच्याकडे असताना लोकसभेची ही जागा शिवसेनेला गेली. हे मतदारसंघ आणि पक्षहितासाठी योग्य नाही. त्यामुळे या निर्णयाचा पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करून संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी अन्यथा आमचे राजीनामे मंजूर करावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

ठाण्यातही भाजपमध्ये नाराजी

ठाण्यातही शिवसेनेच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामानाट्य पाहायला मिळाले. महायुतीतर्फे नरेश म्हस्के हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने यासंदर्भात भाजपची जिल्हा कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये नवी मुंबईप्रमाणे ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर यांना उभे राहण्याचीही गळ घातली. मात्र, वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विरोध मावळला.

म्हस्के हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याने त्या निमित्ताने जिल्हा कार्यकारिणीची बैठक लावण्यात आली होती. त्याला जिल्ह्यातील १५० पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या बैठकीतही अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजीचा सूर लावला. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शिंदे सेनेकडून मनपा व विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांना कशी वागणूक मिळाली याचा पाढाच अनेक पदाधिकाऱ्यांनी वाचला. भाजप नसेल तर आम्ही काम करणार नसल्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. अखेर कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर वरिष्ठांनी त्यांची मनधरणी केली. दोन तास खलबते झाल्यानंतर अखेर कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे मागे घेतले.

ही भाजपची परंपरा नाही - मंदा म्हात्रे

राजीनाम्याचा जो प्रकार सुरू आहे ती भाजपची परंपरा नाही. ज्यांनी राजीनामा दिला आहे ते मूळ भाजपचे नसून गणेश नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. ज्यांनी राजीनामा दिले आहेत ते नाईक समर्थक आहेत. आम्हाला मोदी यांना पंतप्रधानपदी पुन्हा निवडून द्यायचे आहे. हेच उद्दिष्ट ठेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावयाचे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in