उरण : अनेक वर्षांपासून उरणवासीयांना जलद, प्रदुषणविरहित आणि वाहतूककोंडीमुक्त स्वस्त आणि आरामदायी प्रवास घडवून देणारी उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) जलप्रवास सेवा सध्या संकटात सापडली आहे. अटल सेतू आणि उरण रेल्वे सुरू झाल्यामुळे या जलमार्गावर प्रवाशांची संख्या रोडावली आहे.
अटल सेतूवरून मुंबईचे प्रवासाचे अंतर कमी झाल्यामुळे अनेक प्रवासी आपली वाहने घेवून थेट मुंबई गाठताहेत, तर उरण रेल्वेमुळे उरणवरून २० रूपयांमध्ये मुंबईला जाता येत असल्यामुळे अनेक प्रवाशी रेल्वेने स्वस्तामध्ये प्रवास करण्याला पसंती देत आहेत. या नवीन दोन प्रवासाच्या पर्यायामुळे जलप्रवाशांच्या संख्येत जवळजवळ ७५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे या जलप्रवासी मार्गावर बोटी चालविणाऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. शासनाने या जलसेवेकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर मोरा ते भाऊचा धक्का या जलमार्गावरील बोटसेवा बंद करण्याची वेळ बोट मालकांवर येण्याची शक्यता आहे.
प्रवाशांची संख्या रोडावली
सागरी सेतू आणि उरण लोकलमुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुर्वी मुंबईला रस्त्याने प्रवास करताना दोन ते अडीच तासांचा धकाधकीचा प्रवास करावा लागत असे. आत्ता मात्र अटल सेतूमुळे अर्ध्या तासात मुंबईला जाता येते तर रेल्वेने फक्त २० रूपयांमध्ये तासाभरात मुंबईला जाता येते. जलसेवेत ६५ रूपयांमध्ये तासाभरात मुंबईच्या भाऊच्या धक्क्याला जाता येते. पुर्वी या जलसेवेचा लाभ हजार ते पंधराशे प्रवाशी रोज लाभ घेत होते; मात्र आत्ता हीच संख्या २००च्या आत आली आहे. त्यामुळे उरण ते मुंबई ही जलसेवा धोक्यात आली आहे.