नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महामंडळाच्या गृहनिर्माण योजनांमधील पत्रकार प्रवर्गातील घरांकरिता अर्ज करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली असून सिडकोकडूनच योग्य ती शहानिशा करून, पत्रकारांची पात्रता निश्चित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पत्रकार बांधवांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्यासही मदत होणार आहे.
सिडकोकडून सातत्याने गृहनिर्माण योजनांद्वारे सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून दिली जातात. तसेच सिडको गृहनिर्माण योजनांतील सदनिका या विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव ठेवण्यात येतात. यापूर्वी पत्रकारांना, पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून ते पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात कालापव्यय होत असल्याने, पात्रता प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरलेल्या पत्रकारांना सदनिकेचे वाटपत्र देण्यास विलंब होत असे. पत्रकार बांधवांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी व त्यांना सिडकोच्या योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी सिडकोला दिलेल्या निर्देशानुसार शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट सिडकोकडून शिथिल करण्यात आली आहे. यापुढे सदरचे प्रमाणपत्र सिडको स्तरावर निर्गमित करण्यात येणार असून पत्रकार अर्जदारांची पात्रता सिडकोकडूनच निश्चित करण्यात येणार आहे.
सिडकोने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा अनेक पत्रकारांना होणार असून नवी मुंबईसारख्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात हक्काचे घर घेण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. तसेच नवी मुंबईतील पर्यावरण आणि निसर्गाशी उत्तम मेळ साधणाऱ्या दर्जेदार जीवनशैलीचा अनुभव घेण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.
सिडकोने कायम पत्रकारांचा सन्मान केला आहे. पत्रकारितेविषयक उपक्रमांसाठीही सिडकोने नेहमीच सहाय्य केले आहे. यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पत्रकारांना सिडको गृहनिर्माण योजनेतील घरे अधिक सुलभतेने मिळण्याकरिता सिडकोने माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल केली आहे.
-अनिल डिग्गीकर, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिका मिळण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करून सदरचे प्रमाणपत्र सिडको स्तरावर निर्गमित करण्याबाबतचे आदेश सिडकोला देण्यात आले आहेत. समाज आणि शासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांप्रति कृतज्ञता म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री