

नवी मुंबई : दुष्काळी परिस्थिती आणि विविध अडचणींचा सामना करत कांदा उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) वाशी येथील कांदा-बटाटा घाऊक बाजारात इजिप्तचा कांदा दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. बुधवारी एपीएमसी बाजारात इजिप्तमधून आयात करण्यात आलेल्या कांद्याचे दोन कंटेनर दाखल झाले. स्थानिक कांद्याच्या तुलनेत आयात कांदा कमी दरात उपलब्ध होत असल्याने आगामी काळात त्याचा स्थानिक कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राज्यातील कांद्याला घाऊक बाजारात ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्याचवेळी इजिप्तमधून आयात झालेला कांदा एपीएमसी बाजारात सुमारे ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होत असल्याने व्यापाऱ्यांसाठी तो तुलनेने स्वस्त ठरत आहे. त्यामुळे आयात कांद्याची आवक वाढल्यास स्थानिक कांद्याच्या मागणीवर परिणाम होऊन त्याच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयात कांद्याच्या मागणीवरही लक्ष
आयात कांद्याची आवक किती प्रमाणात आणि किती दिवस सुरू राहते, तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडून या कांद्याला कितपत मागणी मिळते, यावर स्थानिक कांद्याच्या बाजारभावाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आयात कांद्याच्या वाढत्या आवकेकडे राज्यातील कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक कांद्याच्या दरावर दबाव
इजिप्तमधून सुमारे ४५० कंटेनर कांदा जेएनपीए बंदरात दाखल झाल्याची माहिती आहे. त्यापैकी दोन कंटेनरमधील कांदा वाशी येथील एपीएमसीच्या कांदा-बटाटा घाऊक बाजारात दाखल झाला आहे. आगामी काळात आयात कांद्याची आवक वाढल्यास बाजारातील एकूण कांदा पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा कांद्याला मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे उत्पादन खर्च भरून काढल्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात नफा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, इजिप्तमधील कमी दरातील कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झाल्यास स्थानिक कांद्याच्या दरावर दबाव निर्माण होऊ शकतो. परिणामी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.