विकसित भारत संकल्प यात्रेला नवी मुंबईत उदंड प्रतिसाद; शहरात १८ जानेवारी पर्यंत ‘संकल्प यात्रा'चे नियोजन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा' उपक्रमाला नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेला नवी मुंबईत उदंड प्रतिसाद; शहरात १८ जानेवारी पर्यंत ‘संकल्प यात्रा'चे नियोजन

नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा' उपक्रमाला नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. २७ डिसेंबर रोजी दिघा पासून सुरु झालेली ‘संकल्प यात्रा' १८ जानेवारी पर्यंत ४५ ठिकाणी केंद्र सरकार, राज्य शासन आणि नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रेचे अत्यंत सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे.

या उपक्रमामध्ये केंद्र आणि राज्य शासन तसेच नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे आणि योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरण्यापासून संपूर्ण सहकार्य करणारे विविध स्टॉल्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृध्दी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी अशा विविध योजनांच्या स्टॉलचा समावेश आहे.

‘विकसित भारत संकल्प यात्रा'मध्ये केंद्र सरकारच्या वतीने योजनांच्या माहिती प्रसारणासाठी एलईडी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर पंतप्रधान मोदी यांचा संदेश प्रसारित केला जात आहे. तसेच विविध योजनांच्या स्टॉल्सवरुन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

५ जानेवारी रोजी तुर्भे विभागात सकाळच्या सत्रात जनता मार्केट ब्रीजलगत ४१४ नागरिकांनी यात्रा उपक्रमात सहभागी होऊन योजनांची माहिती आणि लाभ घेतला. या दिवशी दुपारच्या सत्रात सानपाडा, सेवटर-७ मधील सिताराम मास्टर उद्यान येथे ७२८ नागरिकांनी यात्रा उपक्रमात सहभागी होऊन योजनांची माहिती आणि लाभ घेतला.

६ जानेवारी रोजी फायझर रोड जवळील मोकळ्या जागेत तुर्भे नाका येथे सकाळच्या सत्रात ५४२ नागरिकांनी तर तुर्भेगाव तलावाजवळ येथे दुपारच्या सत्रात ६३० नागरिकांनी उपक्रमात सहभाग घेतला. ७ जानेवारीला सकाळच्या सत्रात माथाडी चौक एपीएमसी मार्केट येथे ६८७ नागरिक यात्रा उपक्रमात सहभागी झाले. या दिवशी दुपारच्या सत्रात वाशी, सेक्टर-९ मार्केट येथे ३७९ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. ८ जानेवारीला सकाळच्या सत्रात वाशी रेल्वे स्टेशन येथे ९०४ नागरिक तर दुपारच्या सत्रात वाशी, सेवटर-२८ मधील डायमंड हॉटेल येथे ३५१ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

दरम्यान, १० जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत वाशी गांव येथे तसेच दुपारी २ ते ५ या वेळेत मनिषा विद्यालय वाशी येथे त्याचप्रमाणे ११ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत इनऑर्बिट मॉल, वाशी येथे आणि दुपारी २ ते ५ या वेळेत दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्र, वाशी येथे यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in