पनवेल : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन अधिकाधिक गुण संपादन करीत यश मिळवायला हवे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी रिटघर येथे केले. बोर्ड परीक्षेला प्रारंभ होणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी शुभचिंतन तसेच मिनी सायन्स लॅबचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. दीपक फर्टिलायझर्स तळोजाच्या आर्थिक सहाय्यातून मिनी सायन्स लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.