मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-टेम्पोची समोरासमोर धडक; टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू

महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्यामुळे एकाच लेनवरुन सुरू असलेल्या वाहतूकीमुळे दोन्ही चालकांना अंदाज न आल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस-टेम्पोची समोरासमोर धडक; टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू

नागोठणे: मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळील निडी गावाच्या हद्दीत हॉटेल ऐश्वर्यासमोर महाड बाजूकडून मुंबईकडे जाणारी एसटी महामंडळाची माणगाव आगारातील बस आणि पनवेल बाजूकडून महाडकडे घर सामान घेऊन जाणारा छोटा टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला असून टेम्पोतून प्रवास करणारे दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. तसेच बसमधील जवळपास दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाता संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार एसटी महामंडळाच्या माणगाव आगारातील बस ही मुंबई-गोवा महामार्गावरून महाडहून बोरिवली येथे जात असताना नागोठणेजवळील निडी गावाच्या हद्दीत आली असता याचवेळी पनवेल बाजूकडून महाड येथे घर सामान घेऊन जाणारा टेम्पोचालक विकास विश्वास सुतार (३०) याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, यामध्ये टेम्पोचा समोरील भाग चेपला गेला होता. यामध्ये टेम्पोचालक विकासचा जागीच मृत्यू झाला. तसेच टेम्पोतून प्रवास करणारे बळीराम तुकाराम कासार (६५) अंकिता बळीराम कासार (३२) या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना नेरूळ येथील डीवाय पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघातात एसटी बसमधील चालक अमित अशोक पवार (३६), मीनाक्षी विनायक कांबळे(४०), श्याम शंकर सुखदरे (४७), प्रिया परशुराम काप (५३), काजल शांताराम धाडवे (४९), विजय गोलांबडे (४०), माधुरी महादेव धुमाळ (४८), सुचिता बाळकृष्ण कांबळे (६५) आदी देखील जखमी झाले आहेत. रविवारी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्यामुळे एकाच लेनवरुन सुरू असलेल्या वाहतूकीमुळे दोन्ही चालकांना अंदाज न आल्याने अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in