Navi Mumbai: ऐरोली, बेलापूर मतदारसंघात ७३ हजार दुबार नावे; शिवसेना शिंदे गटाची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

नवी मुंबईतील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघात सुमारे ७३ हजार मतदारांची नवी मुंबईत आणि त्यांच्या मूळ गाव असलेल्या विधानसभा मतदारसंघात देखील नावांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई: नवी मुंबई विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सद्यस्थितीतील मतदार यादीत अद्यापही घोळ कायम असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईतील १५०-ऐरोली आणि १५१-बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघात सुमारे ७३ हजार मतदारांची नवी मुंबईत आणि त्यांच्या मूळ गाव असलेल्या विधानसभा मतदारसंघात देखील नावांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.

एका विशेष राजकीय परिवाराने यंत्रणा हाताशी धरून ही नावे नोंदवलेली आहे, आणि त्याचाच गैरफायदा घेऊन निवडणूक जिंकण्याचा त्यांचा डाव असल्याची तक्रार बेलापूर विधानसभा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक प्रशासन कामाला लागले आहे. मात्र त्याचबरोबर ऐरोलीमध्ये ४१,५४६ आणि बेलापूरमध्ये ३१,६८६ नावे नवी मुंबईत तसेच इतर ठिकाणच्या मतदार यादीत असल्याचे समोर आले आहे. ही नावे येथील एका विशेष राजकीय परिवाराने यंत्रणा हाताशी धरून नोंदवलेली आहे, आणि त्याचाच गैरफायदा घेऊन निवडणूक जिंकण्याचा त्यांचा डाव आहे. अशा दुबार म्हणजेच दोन्ही मतदारसंघात नावे असलेल्या मतदारांवर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, ते एकाच ठिकाणी मतदान करतात की दोन्ही ठिकाणी मतदान करतात, याबाबत निवडणूक आयोगाने शहानिशा करून मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार थांबवावा, अशी तक्रार बेलापूर विधानसभा शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

नवी मुंबईत एका विशिष्ट राजकीय परिवाराने दुबार मतदार नावे नोंदवली आहेत जी त्यांच्या मूळ गावच्या मतदारसंघात देखील आहेत. या ऐरोली आणि बेलापूरमधील एकूण ७३, २३२ दुबार मतदारांची गैरमार्गाने मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी एका विशिष्ट राजकीय घराण्याने अनेक कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली असून दिवसरात्र ते याच कामासाठी जुंपण्यात आलेले आहेत.

किशोर पाटकर यांचा इशारा

काही ठिकाणी हेच दुबार मतदार अटीतटीच्या लढतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अटीतटीच्या लढतीत काही फरकांच्या मतांनी धक्कादायक निकाल लागल्यास त्यास जबाबदार आपण असणार आहात, याबाबत न्यायालयात जी याचिका दाखल केली जाणार आहे. त्यात आपल्याला देखील प्रतिवादी म्हणून दाखल केले जाईल, याची नोंद घ्यावी असा इशारा किशोर पाटकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवडणूक आयोगाला दिला आहे.

मतदासंघाप्रमाणे दुबार मतदारांची यादी

ऐरोली मतदारसंघ :- पाटण ६ हजार ११४, वाई- ४ हजार ५४३, कोरेगाव- ३हजार ८९६, दक्षिण कराड- ४ हजार ५९५, सातारा ५ हजार २, जुन्नर- १ हजार ७९५, आंबेगाव १ हजार ४९०, भोर- ३ हजार २०३, बेलापूर - ३ हजार ६८२, ऐरोली ७ हजार २२६, एकूण ४१ हजार ५४६ मतदारांचा समावेश आहे.

बेलापूर मतदारसंघ :- पाटण ४ हजार ४२३, वाई-३ हजार ३७२, कोरेगाव- ३ हजार २४४, दक्षिण कराड-३ हजार ६२९, सातारा- ३ हजार ५३०, जुन्नर १ हजार ६८८, आंबेगाव-१ हजार ३७३, भोर-१ हजार ८७८, बेलापूर-३ हजार ६८२, ऐरोली-४ हजार ८६६, एकूण ३१ हजार ६८६ अशी दुबार नावांची संख्या आहे.

निवडणूक आयोगाला इत्यंभूत माहिती इमेलद्वारे आणि लेखी पत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार लोकशाही मजबूत करण्यासाठी अश्या दुबार नावे असलेल्या मतदारांवर निवडणूक आयोगाने नजर ठेवावी. त्यांनी ज्या ठिकाणी मतदान केले आहे, त्याचे सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करून ठेवावे, त्यांच्या नावावर इतर कुणी मतदान करत आहे, का याबाबत सतर्क रहावे अशी विविध प्रकारची कार्यवाही करण्यात यावी आणि निवडणूक झाल्यानंतर या मतदारांवर देखील कार्यवाही करण्यात यावी - किशोर पाटकर, शिवसेना बेलापूर अध्यक्ष, शिंदे गट

logo
marathi.freepressjournal.in