कबुतरांना खाद्य घालणे ठरणार गुन्हा; नवी मुंबईत दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा

नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाईसोबतच फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कबुतरांच्या विष्ठेमुळे पसरणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्याबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
कबुतरांना खाद्य घालणे ठरणार गुन्हा; नवी मुंबईत दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाईसोबतच फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कबुतरांच्या विष्ठेमुळे पसरणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्याबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरात ज्या ठिकाणी कबुतरांची संख्या जास्त आहे, अशा 'कबुतरखान्यांचा' शोध घेऊन जनजागृती मोहीम आणि कडक कारवाई सुरू करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

मुंबईतील दादर येथील कबुतरखाना परिसरात राहणाऱ्या अनेक नागरिकांना कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होत असल्याचा निष्कर्ष समोर आल्यानंतर, न्यायालयाने २० जुलै रोजी दिलेल्या एका निर्णयात कबुतरांना खाद्य पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर, आता नवी मुंबईतही या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत अशा ५१ ठिकाणांची नोंद असून, त्याच धर्तीवर आता नवी मुंबईतील हॉटस्पॉट शोधले जाणार आहेत.

नवी मुंबईत पाम बीच रोड, शिरवणे जेट्टी, वाशीतील सागर विहार आणि मिनी सी शोर, तसेच एमआयडीसी आणि दिघा परिसरात कबुतरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः, वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती आवार आणि मिनी सी शोर येथे हजारो कबुतरे एकत्र जमतात. मिनी सी शोर येथे फिरणारे विक्रेते अनधिकृतपणे कबुतरांसाठी मक्याचे दाणे विकतात.

कबुतरांच्या विष्ठेवर एक विशिष्ट प्रकारची बुरशी वाढते. ही बुरशी वाळल्यानंतर हवेत पसरते आणि श्वासावाटे नाकात प्रवेश करते. यामुळे ऱ्हायनायटिस (सर्दी), त्वचेचे विकार, फुफ्फुसांना सूज येणे (हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनिया) यांसारखे आजार होतात. दमा असलेल्या रुग्णांना तर याचा गंभीर झटका येऊ शकतो, त्यामुळे अशा रुग्णांनी कबुतरे असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे.

डॉ. सचिन गंगावणे, श्वसन विकार तज्ज्ञ

शहरातील ज्या ठिकाणी कबुतरांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणांचा शोध घेतला जाईल. कबुतरांना खाद्य का देऊ नये आणि त्यांच्यामुळे मानवी आरोग्यावर कोणते परिणाम होतात, याबाबत व्यापक जनजागृती केली जाईल. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर न्यायालयाच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील.

डॉ. श्रीकांत तोडकर पशुवैद्यकीय अधिकारी नवी मुंबई मनपा

logo
marathi.freepressjournal.in