अखेर डी मार्टकडून १ कोटी ६० लाख ७५ हजार ४४९ रकमेचा कर वसूल

आरटीओची कामे करणाऱ्या दलालांच्या ६ दुकानांना कर भरण्याची नोटीस
अखेर डी मार्टकडून १ कोटी ६० लाख ७५ हजार ४४९ रकमेचा कर वसूल

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या मालमत्ताकर विभागामार्फत प्रभावी करवसुलीकडे विशेष लक्ष दिले जात असून थकबाकीदारांना आवाहन करून, नोटीस बजावूनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारची करवसुली कारवाई शनिवारी सानपाडा येथील डी मार्टवर करण्यात आली. त्या अनुषंगाने डी मार्ट आस्थापनेने १ कोटी ६० लाख ७५ हजार ४४९ रकमेचा त्वरित ऑनलाईन भरणा केल्याने अटकावणीची कारवाई मागे घेण्यात आली.

महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर आणि अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात ही कारवाई करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या वतीने वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र या नोटिसांना दाद न दिल्याने अखेर कर न भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मालमत्ता अटकावणीची नोटिसा बजावण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार सानपाडा येथील डी मार्टकडे थकीत असलेली १ कोटी ६० लाख रुपयांची कर वसुली करण्याकरिता तुर्भे विभाग कार्यालयातील कर निरीक्षक दत्तात्रय काळे हे पथकासह डी मार्टमध्ये गेले. तसेच डी मार्ट अटकावणीची कारवाई सुरू केली. आरटीओची कामे करणाऱ्या दलालांच्या ६ दुकानांना कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

आठ विभागांमध्ये वसुली मोहीम

सध्या १० ते २५ लाखाहून अधिक रकमेच्या मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या ८ विभाग कार्यालयांतर्गत असणाऱ्या मालमत्ता कर निरीक्षक यांच्याद्वारे ही कर वसुलीची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. आठही विभागांमध्ये शेकडोहून अधिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कारवाई टाळण्याकरिता अनेक मालमत्ताधारक कर भरू लागले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in