चिर्ले येथील वैष्णवी गोदामात आग

या आगीत थोडक्यात कामगार बचावले असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त होत आहे.
चिर्ले येथील वैष्णवी गोदामात आग

उरण : विंधणे येथील सामवेदा गोदामाला लागलेली आग विझते न विझते तोच पुन्हा एकदा एनएच ४ बी लगतच्या चिर्ले येथील वैष्णवी लॉजिस्टिक यार्ड या गोदामात सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. या आगीत थोडक्यात कामगार बचावले असल्याची माहिती कामगारांकडून प्राप्त होत आहे.

उरण तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे महत्वाचे प्रकल्प आहेत. त्यात जेएनपीए बंदरावर आधारित मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाची निर्मिती ही शासकीय नियमांची पायमल्ली करून होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक वेळा देश- परदेशातील मालाची हाताळणी करणाऱ्या सदर गोदामाला आगी लागल्याच्या घटना या वारंवार घडत आहेत. मार्च २०१८मध्ये या वैष्णवी लॉजिस्टीक या मालाची व केमिकलची हाताळणी करणाऱ्या गोदामात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. या स्फोटात गोदामातील कामगारांना आपले जीव गमवावे लागले होते. यावेळी प्रशासनाने गोदाम मालक तसेच संबंधित ठेकेदार यांची पाठराखण करून सदर प्रकरणावर पांघरूण घातले होते. आज पुन्हा एकदा या गोदामाला आग लागल्याती घटना घडली आहे.

सोमवारी (१५ जानेवारी) मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी (ठिक ९-३० ) पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. यावेळी कामगारांच्या सावधगिरीमुळे कामगार थोडक्यात वाचले असल्याची माहीती सुत्राकंडून दिली. या घटनेची माहिती सिडको, जेएनपीए येथील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत. मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला वारंवार आग लागल्याची घटना घडत असल्याने जासई चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून गोदाम मालक व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निळकंठ घरत यांनी केली आहे.

उरण तालुक्यातील जासई तथा चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वैष्णवी लाॅजिस्टीक या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली असून, सदर आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

-डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in