अखेर तुर्भे स्टोअर्स येथील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, वाहतूककाेंडी टाळण्यासाठी 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर्स येथे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच सायन-पवनेल महामार्गावर उरण फाटा येथील उड्डाणपुलावर काँक्रीटीकरणाचे व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
अखेर तुर्भे स्टोअर्स येथील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, वाहतूककाेंडी टाळण्यासाठी 'या' पर्यायी मार्गांचा करा वापर

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर्स येथे उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच सायन-पवनेल महामार्गावर उरण फाटा येथील उड्डाणपुलावर काँक्रीटीकरणाचे व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही कामामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने सदरची कामे पूर्ण होईपर्यंत या दोन्ही मार्गावरू जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्यास सूचित केले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. ही वाहतूककोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाने ठाणे-बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार बेलापूर येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी तुर्भे ओव्हर ब्रीजवरून सानपाडा-वाशी मार्गे ठाण्यात जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच तुर्भे नाका येथून एपीएमसी ब्रीज मार्गे वाशीतून ठाण्याच्या दिशेने जाता येणार आहे. त्याचप्रमाणे तुर्भे नाका येथून उजवीकडे वळण घेऊन एमआयडीसी मार्गे महापे, कल्याणमार्गे ठाणे येथे जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

तसेच तुर्भे उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन शरयु मोटर्सकडून विवांता हॉटेल मार्गे एमआयडीसी रोडने महापेमार्गे इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ठाण्याहून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पावणे ब्रीजवरून एपीएमसी मार्केट रोडने इच्छितस्थळी जाता येणार आहे. तसेच पावणे ब्रीज व सविता केमिकल कंपनी येथून डावीकडे वळण घेऊन एमआयडीसीमार्गे इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सायन पनवेल मार्गावर सीबीडी येथे उरणफाटा ब्रीजवर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सीबीडी बेलापूर ते उरणफाटा ब्रीज येथे वाहतूककोंडी होऊ लागली आहे.

सीबीडी बेलापूर येथे वाहतूक सुरळीत सुरू राहावी यासाठी खारघर, कळंबोली, पनवेल व इतर सर्व परिसरातील वाहनचालकांना कळंबोली सर्कल येथून अटल सेतू मार्गे मुंबईकडे जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच कळंबोली येथून तळोजा मार्गे ठाण्याकडे जाता येणार आहे. सीबीडी येथून पामबीच मार्गे वाशी येथून मुंबईकडे जाता येणार आहे. त्याचप्रमाणे पुणे मुंबई एक्स्प्रेस मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी कोन ब्रिज, पळस्पे फाटा, गव्हाण फाटा मार्गे अटल सेतू मार्गे जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर्स येथे तसेच सायन-पवनेल महामार्गावर उरण फाटा येथे काम सुरू करण्यात आल्याने या दोन्ही ठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे येथील वाहतूककोंडी टाळण्यासाठी सदरची कामे पूर्ण होईपर्यंत या दोन्ही मार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूककोंडी टाळण्यासाठी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

- तिरुपती काकडे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई

logo
marathi.freepressjournal.in