पांडवकडा धबधब्यावर वन कर्मचारी तैनात

पुणे लोणावळा परिसरातील भुशी धरणाजवळील धबधब्यावर दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जण प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला होता.
पांडवकडा धबधब्यावर वन कर्मचारी तैनात
Published on

नवी मुंबई : पांडवकडा धबधबा परिसरात दुर्घटना घडू नये, यासाठी वन विभागाच्या वतीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. खारघर पोलिसांकडून धोकादायक पर्यटनस्थळावर बंदी असल्याचे फलक खारघर परिसरातील धबधबा परिसर तसेच रस्त्यावरील दर्शनी भागात लावण्यात आले आहे.

पुणे लोणावळा परिसरातील भुशी धरणाजवळील धबधब्यावर दोन लहान मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जण प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाला होता. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांच्या विभागातील धोकादायक पर्यटनस्थळांचा आढावा घेण्याच्या सूचना करून पावसाळी पर्यटनात अशा घटना घडू नये, पर्यटक सुरक्षित राहावे यासाठी सर्व धोकादायक स्थळांवर सूचना फलक लावण्यात यावे. तसेच, पर्यटन ठिकाणी जीवनरक्षक तैनात करण्यात यावे, असे आदेश दिले होते. दरम्यान नवी मुंबई आणि पनवेलकरांचा पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला, पांडवकडा धबधबा आणि आजूबाजूचा नयनरम्य निसर्ग परिसर लाखो पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. पाऊस चांगला पडल्यास पर्यटकांची पावले पांडवकड्याकडे आपोआपच वळू लागतात. खारघर परिसरातील तलाव तसेच पांडवकडा धबधब्यावर गेल्या १५ वर्षात तीसहून अधिक पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली आहे.

दरम्यान, विधानसभेत पुणे येथील मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वन विभागाकडून पांडवकडा धबधबा परिसरात २ कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच खारघर पोलिसांकडून पांडवकडा धबधबा आणि तलाव परिसरात पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून फलक लावण्यात आले आहे.

खारघरमधील पांडवकडा धबधबा परिसरात पोलिसांकडून मनाई आदेशाचे फलक लावण्यात आले आहे. - विजय पाटील, तहसीलदार-पनवेल

पांडवकडा धबधबा परिसरात दुर्घटना घडू नये, यासाठी वन विभागाकडून दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. - डी. एस. सोनावणे, वन परीक्षेत्र अधिकारी- वन विभाग पनवेल.

logo
marathi.freepressjournal.in